धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 12:21 PM2024-11-10T12:21:16+5:302024-11-10T12:22:37+5:30

बिहारमधील बनावट IPS नंतर आता राजस्थानमध्ये एक बनावट IRS समोर आला आहे.

rajasthan fake rs ncb zonal director arrested after trapped 25 girls and blackmailed | धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश

फोटो - आजतक

बिहारमधील बनावट IPS नंतर आता राजस्थानमध्ये एक बनावट IRS समोर आला आहे, ज्याने नॅशनल नार्कोटिक्स ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर असल्याचं सांगून  सरकारी नोकरी करणाऱ्या मुलींना आपल्या जाळ्यात अडकलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे अश्लील फोटो काढले होते. तो त्यानंतर मुलींना ब्लॅकमेल करायचा. एका मुलीला संशय आल्याने तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

जयपूर येथील नॅशनल नार्कोटिक्स ब्युरोच्या कार्यालयाला याबाबत माहिती मिळताच विधाधर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या बनावट झोनल डायरेक्टरला मुलीच्या माध्यमातून जयपूर येथील हॉटेलमध्ये बोलावून अटक केली. त्याच्या अटकेनंतरही, तो स्वत:ला २०२० बॅचचा IRS अधिकारी म्हणवत राहिला आणि म्हणाला की, त्याची नॅशनल नार्कोटिक्स ब्युरोच्या जयपूर कार्यालयात झोनल डायरेक्टर पदावर बदली झाली आहे.

मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथे राहणारा सर्वेश कुमावत कधी एनसीबीचा झोनल डायरेक्टर तर कधी इन्कम टॅक्स कमिशनर असल्याचे भासवून मुली आणि महिलांशी चॅट करायचा. यात प्रामुख्याने सरकारी नोकरीत काम करणाऱ्या मुलींना तो लक्ष्य करायचा. त्याने त्याच्या बनावट सोशल मीडिया प्रोफाइलवर यथा दृष्टी आणि सृष्टी असं देखील लिहिलं होतं. आरोपी सर्वेश कुमावतने जयपूरमध्ये तीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवलं. 

एका मुलीला संशय आल्याने तिने जयपूर येथील नॅशनल नार्कोटिक्स ब्युरोच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. नॅशनल नार्कोटिक्स ब्युरोच्या सांगण्यावरून मुलीने पुरावे मागितले असता, त्याने मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडवर नार्कोटिक्स ब्युरोच्या भारत सरकारचं बनावट स्वाक्षरीचं पत्र दिलं. यानंतर अधिकाऱ्यांनी विद्याधर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सापळा रचून त्याला जयपूरमधील अजमेर रोडवरील हॉटेलमध्ये बोलावलं.

आरोपीचा मोबाईल तपासला असता त्याने २५ मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचं समोर आलं आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अनेक अश्लील चॅट आणि फोटो सापडले आहेत. विद्याधर नगरचे एसएचओ राकेश यांनी सांगितलं की, नॅशनल ब्युरोच्या उपनिरीक्षकाकडून रिपोर्ट मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: rajasthan fake rs ncb zonal director arrested after trapped 25 girls and blackmailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.