पतीला तलाक हवाय, तक्रारदार महिला पोलीस ठाण्यात पोहचली अन् त्याठिकाणी लाजिरवाणी गोष्ट घडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:43 AM2021-03-08T10:43:12+5:302021-03-08T10:44:40+5:30
Police Officer Rape on women: खेडली ठाण्याचे उपनिरीक्षक भरत सिंहने महिलेला एका रुममध्ये घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.
जयपूर – जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा बोजवारा उडतो, राजस्थानच्या अलवार येथे अशीच एक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात पोलिसांच्या खाकीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी घटना घडली आहे. अलवार जिल्ह्याच्या खेडली पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन पोहचलेल्या पीडित महिलेला पोलीस उपनिरीक्षकाने वासनेचा शिकार बनवलं आहे.
खेडली ठाण्याचे उपनिरीक्षक भरत सिंहने महिलेला एका रुममध्ये घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय महिलेवर ५४ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. या पीडित महिलेने पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, २ मार्च मी माझ्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते, माझा पती मला तलाक देऊ इच्छितो, पण मला तलाक नको, त्यामुळे त्याच्याविरोधात महिलेने पोलीस ठाणे गाठले होते.
त्यानंतर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांनी मला पतीसोबत साम्यंजस्याने तोडगा काढू असं सांगत मला जाळ्यात ओढलं, आणि ३ दिवस माझ्यावर बलात्कार केला. ५४ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक भरत सिंहने २६ वर्षीय तक्रारदार महिलेला पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या त्याच्या कार्यालयात आणि घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या आरोपानुसार ३ दिवस तिच्या पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला. त्यानंतरही कोणतीच कारवाई केली नाही. महिलेला ७ मार्च रोजी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं, तेव्हा तिने विरोध केला, दुपारनंतर जेव्हा ती महिला पोलीस ठाण्यात पोहचली तेव्हा तिने पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दिली. प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात पोहचले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
याबाबत पोलीस महासंचालक हवासिंह घुमारिया म्हणाले की, पीडित महिलेने २, ३ आणि ४ मार्चला बलात्कार झाल्याची घटना सांगितली, प्राथमिक चौकशीत पोलीस अधिकारी भरत सिंह दोषी आढळले आहेत. त्यांना आम्ही अटक केली आहे, विशेष म्हणजे अलवर पोलीस महिलांच्या बाबतीत तक्रारीवेळी बेजबाबदार आणि लैंगिक शोषणामुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर बलात्कार केला. ५ दिवसांपूर्वी अरावली विहार ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल रामजीत गुर्जर यांच्याविरोधातही महिलेने बलात्काराची तक्रार दिली आहे.