बसमध्ये सापडला खजिना; ४०० किलो चांदी; ७७२ किलोंचे दागिने; घबाड पाहून पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:14 IST2022-05-09T18:10:27+5:302022-05-09T18:14:17+5:30
बसमध्ये पार्सलचे बॉक्स सापडले; घबाड पाहून पोलिसांना बसला धक्का

बसमध्ये सापडला खजिना; ४०० किलो चांदी; ७७२ किलोंचे दागिने; घबाड पाहून पोलीस चक्रावले
उदयपूर: अहमदाबादकडून येणाऱ्या एका बसमध्ये पोलिसांना घबाड सापडलं आहे. उदयपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बसमध्ये आढळून आलेल्या १०५ पार्सलमध्ये चांदीचे ब्लॉक्स सापडले. त्यांचं वजन ४ क्विंटल ५० किलो भरलं. त्याशिवाय चांदीचे दागिनेदेखील आढळून आले. त्यांचं वजन ७ क्विंटल ७२ किलो होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बलिचा बायपासजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एका बसमध्ये अनेक पार्सल्स आढळून आल्याची माहिती गोवर्धन विलास ठाण्याचे प्रभारी असलेल्या चैल सिंह यांनी दिली. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अहमदाबादकडून येणारी श्रीनाथ ट्रॅव्हल्सची बस रोखली. बसमध्ये पार्सल्सचे बॉक्स मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं पोलिसांना संशय आला. त्यांनी सगळे बॉक्स उघडायला लावले. त्यात चांदीचे ब्लॉक्स आढळून आले.
याबद्दल पोलिसांनी बस चालकाकडे विचारणा केली. मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यानंतर पोलिसांनी बस ताब्यात घेतली. ती पोलीस ठाण्यात नेली. अहमदाबादमध्ये सर्व पार्सल्स ठेवले गेल्याची माहिती चालकानं दिली. पार्सल्स उदयपूर, नाथद्वारा आणि अन्य ठिकाणी पोहचते करायचे होते. मात्र त्या बॉक्सच्या आत काय होतं, याची माहिती मला नव्हती, असं चालकानं जबाबात सांगितलं.