राजस्थानमध्ये ACB ची मोठी कारवाई! 2 लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:49 AM2020-11-26T10:49:15+5:302020-11-26T10:54:01+5:30
Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai Cops : बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.
जयपूर - राजस्थानच्या जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. दोन लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यासह तीन कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चारही पोलीस हे बोरीवलीतील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एका प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी हे चारही जण जयपूरला आले होते. त्याचवेळी त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे. राजस्थान लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली असून त्यांनी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, कॉन्स्टेबल लक्ष्मण, सुभाष पांडुरंग आणि सचिन गुडके अशी या अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
Jaipur: Rajasthan's Anti Corruption Bureau has arrested four Mumbai Police personnel for allegedly demanding and accepting a bribe of Rs 2 lakhs.
— ANI (@ANI) November 26, 2020
मुंबईत राहणारा कापड व्यापारी विनोद हा बोरिवलीत भाडे तत्वावर दुकान चालवतो. याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे आणि त्याचे पथक जयपूरला विनोदला अटक करण्यासाठी गेले. तेव्हा त्याच्या वडिलांनाही अटक करण्याचे त्यांनी धमकावले. तसेच त्यांच्याकडून दोन लाखांची मागणी केली असा आरोप आहे. त्यानुसार त्यांच्या घर मालकाने जयपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.