"सॉरी आई, मी तुला मारलं, मला तुझी आठवण येतेय"; हत्येनंतर मुलाने इन्स्टावर ठेवली स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:11 AM2024-08-31T10:11:06+5:302024-08-31T10:16:45+5:30
एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने आईची हत्या केल्यावर इन्स्टाग्रामवर स्टोरीही अपलोड केली.
गुजरातमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने आईची हत्या केल्यावर इन्स्टाग्रामवर स्टोरीही अपलोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. आरोपी मुलालाही अटक केली आहे. त्यानंतर महिलेच्या अंत्यसंस्काराचीही व्यवस्था केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण गुजरातमधील राजकोटचे आहे. जिथे सरकारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या निलेश नावाच्या व्यक्तीने आईची हत्या केली. एसीपी राधिका भारद्वाज यांनी सांगितलं की, भरत नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. निलेशने आईची हत्या केल्याची माहिती त्याने फोनवर दिली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून ४८ वर्षीय ज्योतीबेन गोसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी निलेशची चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी निलेशची चौकशी केली असता त्याने त्याला मानसिक त्रास होत असल्याचं सांगितलं. तो आत्महत्या करणार होता पण त्याच्या आईने त्याला अडवलं आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. यानंतर आरोपी निलेशने चादरीने आईचा गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी देखील पोस्ट केली ज्यामध्ये त्याने आईसोबतचा एक फोटो शेअर केला. आईसोबतच्या फोटोवर त्याने लिहिले, "सॉरी आई, मी तुला मारलं, मला तुझी आठवण येतेय. ओम शांती."
आरोपी निलेशची आई ज्योतीबेन या अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. निलेशच्या वडिलांनीही त्याला आणि ज्योतीबेनला २० वर्षांपूर्वी सोडून दिले होते. त्यानंतर आई आणि मुलगा राहत होते. निलेशच्या म्हणण्यानुसार, ज्योतीबेन यांनी सुमारे एक महिन्यापासून औषधं घेणं बंद केलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. या कारणावरून आई आणि मुलामध्ये रोज भांडण व्हायचं.
पोलिसांनी निलेशला अटक करून ज्योतीबेन यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह आल्यावर पोलिसांनी महिलेच्या पतीला बोलावून मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, तिच्या पतीने महिलेचा मृतदेह घेण्यास नकार दिला. या महिलेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.