खुनाच्या गुन्ह्यात राजू पाटील सहभागी असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:08 AM2019-06-07T04:08:54+5:302019-06-07T04:09:01+5:30
अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरण : विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद
अलिबाग : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे खून खटल्यातील आरोपी राजू पाटीलचा या खुनात सहभागी असल्याचा दावा विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी गुरुवारी येथील जिल्हा न्यायाधीश-३ व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात सुरूअसलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला.
खुनाच्या दिवशी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरने राजू पाटीलला फोन करून बोलावले. तो मंत्रालयातून कुरुंदकरच्या भार्इंदरच्या घरी पोहोचला. अश्विनी यांचा खून करायचा असल्याचे पाटीलला माहीत होते. खुनानंतर रात्री दीडच्या सुमारास पाटील भार्इंदर येथून निघून आमदार निवासात येऊन झोपला. गुन्ह्याच्या संपूर्ण कालावधीत त्याची मोबाइल लोकेशन्स सबळ पुरावा म्हणून तपास यंत्रणेने न्यायालयात दाखल केली आहेत, असेही घरत यांनी सांगितले.
राजू पाटील याचे वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी राजू पाटीलबाबत पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने त्यास दोषमुक्त करावे याकरिता न्यायालयासमोर युक्तिवाद केला. राजू पाटील याच्यावर दोषारोप ठेवण्याइतका पुरावा तपास यंत्रणेने सादर केलेला नाही. त्याचा या गुन्ह्यात सहभाग होता हे सिद्ध करण्यास पुरावा पुरेसा नाही. परिणामी, राजू पाटील यास दोषमुक्त करावे, असा युक्तिवाद अॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयात केला. पण, राजू पाटीलची मोबाइल लोकेशन्स बघता खून करणे आणि खुनाचा कट या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता हे स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात दाखवले आहेत. त्यामुळे त्याचा खुनात आणि खुनाच्या कटात सहभाग नव्हता असे म्हणता येणार नाही, असे अॅड. प्रदीप घरत यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.
११ जूनला होणार पुढील सुनावणी
मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला. यापूर्वी दाखल केलेला जामीन अर्ज कुरुंदकर याने मागे घेतला होता. तसेच कुंदन भंडारी व महेश फळणीकर या आरोपींचे वकील या सुनावणी वेळी आले नसल्याने त्या दोघांची बाजू गुरु वारी मांडण्यात आली नाही. संपूर्ण युक्तिवादाअंती अभय कुरुंदकर यांच्या जामीन अर्जावरील निर्णय व पुढील सुनावणी सत्र न्यायाधीशांनी मंगळवार, ११ जून रोजी ठेवली आहे.