राकेश पाटील हत्या प्रकरण : मानेवरचा घावच बेतला जीवावर, आरोपी आले होते हत्येच्या हेतूनेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 01:33 AM2020-10-31T01:33:38+5:302020-10-31T01:34:14+5:30

Rakesh Patil murder case News : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे.

Rakesh Patil murder case: accused had come with intent to kill | राकेश पाटील हत्या प्रकरण : मानेवरचा घावच बेतला जीवावर, आरोपी आले होते हत्येच्या हेतूनेच

राकेश पाटील हत्या प्रकरण : मानेवरचा घावच बेतला जीवावर, आरोपी आले होते हत्येच्या हेतूनेच

googlenewsNext

 अंबरनाथ : राकेश पाटील यांची हत्या झाल्यावर नेमकी ही हत्या का आणि कशी झाली, याचे कारण पुढे येत आहे. पाटील यांना एका इमारतीच्या ग्रीलचे काम मिळाले होते. मात्र, ते काम डी. मोहन यांना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दिले होते. त्यावरून राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला आणि त्याच वादातून डी. मोहन याने साथीदारांच्या मदतीने पाटील यांंची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येच्या वेळी राकेश याचा भाऊ आणि त्याचे मित्रही सोबत होते. राकेश यांच्या शरीरावर नऊ वार करण्यात आले असून त्यातील एक घाव हा मानेवर होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ शिव मंदिर परिसरातील जैनम रेसिडेन्सी या इमारतीच्या आवारात राकेश आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला होता. राकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांची जागा एका बिल्डरला विकासासाठी दिली आहे. त्या जागेपासून बाजूलाच नव्या इमारतीचे काम सुरू असून त्याच बिल्डरची जागा असल्याने तेेथील काम संबंधित बांधकाम व्यावसायिकाने राकेश यांना दिले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र, हे काम करताना डी. मोहन याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून परस्पर त्या इमारतीच्या ग्रीलचे काम घेतले होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे राकेश आणि त्याचे भाऊ जे काम करत होते, तेच काम डी. मोहन यांनी मिळविल्याने पाटील आणि डी. मोहन यांच्यात वाद झाला. त्यामुळेच डी. मोहन आणि त्यांच्या साथीदारांनी राकेश, त्याचा भाऊ अजय आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला.

या हल्ल्यात राकेश यालाच लक्ष्य करत धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र आणि भावाने प्रयत्न केला. मात्र, त्यांनी राकेशच्या मानेवर आणि पाठीवर घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. मारेकरी हे गाडीमध्ये शस्त्र घेऊनच आल्याने मारेकऱ्यांचा हेतू हा राकेश यांना मारण्याचाच होता, हे समोर आले आहे. 

...ही तर सत्तेची मस्ती : बाळा नांदगावकर यांचा आरोप
राकेशची हत्या म्हणजे सत्तेची मस्ती आहे. हल्लेखोरांसोबत हत्येचा कट रचणारे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही हत्या ठरवून केली आहे. पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात वास्तव मांडून आरोपींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. नांदगावकर, आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी राकेश यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ही हत्या करून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोबाइलवर पाटील यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन त्यांना सांत्वन दिले.

Web Title: Rakesh Patil murder case: accused had come with intent to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.