शहरातील रस्त्यावर उभ्या वाहनांची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 03:16 AM2018-07-30T03:16:10+5:302018-07-30T03:16:38+5:30
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भुरट्या व जबरी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई : शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भुरट्या व जबरी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून आतील किमती ऐवज चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रविवारी वाशी पामबीच मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांना या भुरट्या चोरट्यांचा फटका बसला आहे. त्यामुळे वाहनधारकांत असुरक्षिततेची भावना बळावली आहे.
रविवारी पामबीच मार्गावर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. इनआॅर्बिट मॉलपासून ही मॅरेथॉन सुरू होणार असल्याने स्पर्धकांनी या परिसरातील रस्त्यावर आपली वाहने उभी केली होती. चोरट्यांनी सहा ते सात वाहनांच्या काचा फोडून आतील मोबाइल व इतक किमती साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे शहरात अगोदरच पार्किंगचे नियोजन फसले आहे. त्यामुळे वाहनधारक रस्त्यावर जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. नेमका याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आहे. वाहनांतील मोबाइल, लॅपटॉप आदी किमती साहित्य लंपास करणारी टोळी शहरात सक्रिय झाली. या घटना दिवसाढवळ्या अगदी बेमालूपपणे होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली जात आहे. काही महिन्यापूर्वी वाशी सेक्टर २९ येथे रात्रीच्या सुमारास दहा-बारा वाहनांच्या काचा फोडून आतील कार टेप चोरून नेल्याची घटना घडली होती. तर कोपरखैरणे परिसरातही रात्रीच्या वेळी वाहनांतील कार टेप व इतर साहित्य चोरणाºया टोळीचा उपद्रव वाढला. काही ठिकाणी तर वाहनांचे टायर चोरीला जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहने पार्क करणाºया वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.
पे अॅण्ड पार्किंगही असुरक्षित
महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पे अॅण्ड पार्किंग सुरू केले आहेत, परंतु या पार्किंगमध्ये सुध्दा वाहनांच्या सुरक्षिततेची हमी घेतली जात नाही. रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पार्किंगमधून वाहनातील इंधन चोरीला जाण्याच्या नेहमीच्या तक्रारी आहेत. वाशी रेल्वे स्थानकाजवळील पे अॅण्ड पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीमधून पेट्रोल काढण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरातील वाहनधारकांत कमालीची चिंता निर्माण झाली आहे. या प्रकाराबाबत पोलीस यंत्रणा मूग गिळून बसल्याने चोरट्यांचे अधिक फावल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत.