मडगाव न्यायालयातून पळालेल्या रामचंद्रनला सहा महिन्याची कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:28 PM2019-10-12T17:28:43+5:302019-10-12T17:30:50+5:30
ब्रिटीश महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक : सुनावणीस आणले असता झाला फरार
मडगाव - बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आणि मागाहून अटक करण्यात आलेल्या रामचंद्रन चंद्रयल्लप्पा या संशयिताला मडगाव न्यायालयाने कोठडीतून फरार झाल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून सहा महिन्याच्या कैदेची शिक्षा ठोठावली. मूळ तामिळनाडू येथील या संशयिताला मागच्यावर्षी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी शाहीर इसानी यांनी ही शिक्षा ठोठावली. 28 जून रोजी सदर आरोपीला मडगाव न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता शौचाचे निमित्त करुन न्यायालयाच्या खालच्या मजल्यावरील शौचालयात जाऊन नंतर खिडकीचे ग्रील उखडून पळून गेला होता. त्यानंतर 17 जुलै रोजी मडगाव पोलिसांनी त्याला बंगळुरु येथून अटक करुन पुन्हा गोव्यात आणले होते.
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पहाटेच्या दरम्यान काणकोण रेल्वे स्थानकावर आपल्या मैत्रिणीला सोडायला आलेल्या एका ब्रिटीश महिलेवर सदर आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याने या महिलेकडील मौल्यवान वस्तू घेऊन रेल्वेने पळ काढला होता. मात्र हा गुन्हा करताना त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर टिपली गेल्याने त्या छबीच्या आधाराने त्याला मडगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यावर अटक केली होती. सदर संशयित तामिळनाडूतील एका चोरटय़ांच्या टोळीचा सदस्य होता. हा बलात्कार करण्यापूर्वी त्याने व त्याच्या इतर साथीदारांनी पेडणे तालुक्यात पर्यटकांना लुटून मडगाव गाठले होते. मडगावहून ते आपल्या गावात पलायन करण्याच्या तयारीत असताना त्या टोळीला अटक झाली होती. सध्या या आरोपीवर काणकोण तसेच पेडणे येथील गुन्हय़ासंदर्भात सुनावणी चालू आहे.