रामदेवबाबा विद्यापीठात प्रवेशाच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक
By योगेश पांडे | Updated: April 3, 2025 22:50 IST2025-04-03T22:49:53+5:302025-04-03T22:50:06+5:30
बोगस आयकार्डदेखील दिले :

रामदेवबाबा विद्यापीठात प्रवेशाच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील रामदेवबाबा विद्यापीठात प्रवेशाच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार झाला असून बुधवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.
दुर्योधन ईश्वर भजनकर (४७, रेवतकर ले-आउट, उमरेड) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांना त्यांच्या मुलाचा प्रवेश रामदेवबाबा विद्यापीठात करायचा होता. मात्र गुण कमी असल्याने ते शक्य झाले नाही. मात्र २४ जानेवारी २०२४ रोजी त्यांची नातेवाइकाच्या माध्यमातून आकाश ढेपे (३५) याच्यासोबत ओळख झाली. आकाशने मुलाचा विद्यापीठात सहजतेने प्रवेश होईल, मात्र चार लाख रुपये लागतील असे सांगितले. या कटात त्याच्यासोबत राजकीय कार्यकर्ता रमन कनोजिया (४०), रामदेवबाबामध्ये प्राध्यापक असल्याची बतावणी करणारा क्षितिज नवघरे (३५), अक्षय अशोक घोगले (३५) व आणखी एक आरोपी सहभागी होते. त्यांनी त्यांचा विद्यापीठात चांगला संपर्क असल्याचा दावा करत भजनकर यांच्याकडून ४.१० लाख रुपये घेतले व त्याची त्यांच्या मुलाला पावतीदेखील दिली.
मुलाने घरी पावती दाखविली असता त्यावर महाविद्यालयाचा स्टॅम्प नव्हता. आरोपींनी भजनकर यांच्या मुलाला बनावट आयकार्डदेखील दिले. मात्र आम्ही सांगू तेव्हाच महाविद्यालयात वर्गांसाठी जायचे असे त्यांनी सांगितले होते. पैसे देऊनदेखील मुलाचा २० दिवस प्रवेश झालाच नाही. त्यामुळे भजनकर यांनी चौकशी केली असता आरोपींनी बनावट पावती दिल्याची बाब समोर आली. आरोपींनी त्यांना पैसे परत देण्यासदेखील नकार दिला. अखेर भजनकर यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.