राणाची पत्नी, मुलींच्या जामिनाचा निर्णय राखीव, उच्च न्यायालयाचा निकाल मंगळवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:48 AM2021-09-24T09:48:58+5:302021-09-24T09:50:25+5:30
राणा कपूर याची पत्नी बिंदू व मुली रोशनी व राधा कपूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे गुरुवारी होती.
मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूरची पत्नी बिंदू व मुली राधा आणि रोशनी कपूर यांनी केलेल्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला. न्यायालय २८ सप्टेंबर रोजी त्यांच्या अर्जावर निकाल देण्याची शक्यता आहे.
राणा कपूर याची पत्नी बिंदू व मुली रोशनी व राधा कपूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे गुरुवारी होती. विशेष न्यायालयाने १८ सप्टेंबर रोजी बिंदू, रोशनी व राधा कपूर यांचा जामीन अर्ज फेटाळला. डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या तिघीही आरोपी आहेत. सुरुवातीला तपास यंत्रणेने या तिघींनाही अटक केली नाही. न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
गेल्या वर्षी ८ मार्च रोजी राणा कपूर याला ईडीने अटक केली. त्यानेही न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारून चूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही, असे तिघींनी अर्जात म्हटले आहे.
ईडीतर्फे ॲड. हितेन वेणेगावकर यांनी विशेष न्यायालयाने या तिघींचा अर्ज फेटाळून योग्य कारवाई केल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. या तिघी खटल्यासाठी न्यायालयात उपस्थित राहाव्यात यासाठी न्यायालयाने या तिघींचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.