"माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीच नाही"; संतापलेल्या बॉयफ्रेंडने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:19 PM2024-02-08T16:19:53+5:302024-02-08T16:27:34+5:30
जंगलात तीन दिवसांपूर्वी एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात जाळल्याच्या प्रकरणामागचं गूढ उकललं आहे.
झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रांची पोलिसांनी मांडर येथील हातमा जंगलात तीन दिवसांपूर्वी एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात जाळल्याच्या प्रकरणामागचं गूढ उकललं आहे. मुलीच्या प्रियकरानेच हे केल्याचं समोर आलं आहे. मुलीचं लग्न ठरल्याचा राग आल्याने आरोपीने 2 फेब्रुवारी रोजी मुलीला जंगलात बोलावून तिची हत्या केली. 3 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. रांची पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे.
ग्रामीण एसपी मनीष टोप्पो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडर पोलिसांनी आरोपी प्रियकर अवनीश कुमारला अटक केली आहे. पोलिसांच्या टीमने हत्येमध्ये वापरलेले सामान देखील जप्त केलं आहे. एसपी म्हणाले की, हातमा जंगलात एका मुलीचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना गावकऱ्यांकडून मिळाली. डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
मुलीचा मोबाईल 2 फेब्रुवारीपासून बंद होता. मुलीचे कॉल डिटेल्स मिळवले असता, आरोपीसोबत झालेल्या तिच्या शेवटच्या संभाषणाची माहिती मिळाली. आरोपीच्या चौकशीत हा खुलासा झाला. कसून चौकशी केल्यानंतर आरोपी अवनीशने हत्येचं रहस्य उघड केलं. मुलीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं त्याने सांगितलं. मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवलं होतं.
मुलीने घरच्यांना विरोध केला नाही. तसेच त्याला देखील याबाबत माहिती दिली नाही. मुलीचं लग्न झाल्याचं समजताच अवनीशने मुलीला 2 फेब्रुवारीला भेटायला बोलावून जंगलात नेलं. तिने त्याने तिची गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या दिवशी 3 फेब्रुवारी रोजी तो पुन्हा घटनास्थळी पोहोचला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला आणि फरार झाला.