'रंग माझा वेगळा' प्रत्यक्षात! गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याचे ठरले, आमदार महोदय पोहोचलेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 02:44 PM2022-06-19T14:44:53+5:302022-06-19T14:45:33+5:30
स्थानिक प्रसारमाध्यमांशी फोनवरून झालेल्या संभाषणात विजय शंकर यांनी लग्नाची गोष्ट स्वीकार केली आहे.
मराठी सिरीअल 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिक आणि आयशाची स्टोरी खऱ्या आय़ुष्यातही प्रत्यक्षात घडली आहे. ओडिशातील बीजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्ज दिला होता. परंतू लग्नाच्या दिवशी पोहोचलेच नाहीत. आता प्रेयसीच्या तक्रारीवर पोलिसांनी आमदारावर गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टनुसार शुक्रवारी जगतसिंहपूरच्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तिरतोल मतदारसंघाचे आमदार विजय शंकर दास यांच्या लग्नाची नोंदणी होणार होती. प्रेयसी सोमालिका ही ठरलेल्या वेळेत कार्यालयात पोहोचली. मात्र, तिथे दास यांच्या कुटुंबातील किंवा स्वत: दास देखील आले नाहीत. जवळपास तीन तास तिने त्यांची वाट पाहिली. फोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सोमलिका ही रजिस्ट्रार ऑफिसमधून बाहेर पडली.
सोमलिकाने पोलिस ठाणे गाठत दास आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दास हे तिच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधांत होते. त्यांनी तिच्यासोबत फसवणूक आणि शारीरीक शोषण केल्याचा दावा तिने केला आहे. दास यांनी लग्नाचे आश्वासन दिले होते. परंतू, आता तो तिचे फोन उचलत नाहीय. दास यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय आपल्याला धमकी देत असल्याचा आरोप तिने केला आहे.
१७ मे रोजी आम्ही दोघांनी विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करण्यासाठी अर्ज दिला होता. कोर्ट मॅरिज करण्यात येणार होते. परंतू त्यांनी फसविले असा आरोप सोमलिका यांनी केला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांशी फोनवरून झालेल्या संभाषणात विजय शंकर यांनी लग्नाची गोष्ट स्वीकार केली आहे. परंतू, विवाह नोंदणी अर्ज केल्यानंतर 90 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अजून ६० दिवस बाकी आहेत. आज लग्नाच्या नोंदणीबाबत मला कोणाकडूनही माहिती मिळालेली नाही, असे म्हटले आहे.