कौर्याची परिसीमा ! मित्राचे वडील रागावल्याने संपवले त्याचे कुटुंबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:37 AM2019-09-26T11:37:45+5:302019-09-26T11:49:54+5:30
एकाच कुटुंबातील तिघांच्या खुनाने चिकलठाणा परिसर हादरला
औरंगाबाद : घरी येणारा मुलाचा मित्र आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवतो म्हणून त्याच्यावर रागावलेले तिचे आई-वडील आणि भाऊ, अशा तिघांनाही माथेफिरू तरुणाने घरात घुसून धारदार चाकूने अनेक वार करून क्षणार्धात संपविले. या क्रौर्याने चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी बुधवारी (दि. २५) रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास हादरली. काही मिनिटांत तिघांचे शिरकाण करून रक्ताने माखलेला चाकू व थपथपलेल्या अंगावरील कपड्यानिशी तो क्रूरकर्मा सुमारे अर्धा तास तंबाखू मळत घराबाहेर उभा होता.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. दिनकर भिकाजी बोराडे (५५), कमलबाई दिनकर बोराडे (५०) आणि भगवान दिनकर बोराडे (२६, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) या तिघांचा खून झाला. अमोल भागीनाथ बोर्डे (२६, रा. चिकलठाणा, चौधरी कॉलनी), असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अमोल आणि मृत हे चौधरी कॉलनीतील एकाच गल्लीत राहतात. आरोपी अमोल आणि मृत भगवान हे वर्गमित्र होते. दोघांचे प्राथमिक आणि दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत झाले. यामुळे अमोलचे भगवानच्या घरी सतत येणे-जाणे होते. भगवान हा आई कमलबाई, वडील दिनकर आणि मोठी बहीण विमल गजानन जावळे (३५) तिचा मुलगा भय्या (१०) आणि पाचवर्षीय भाची यांच्यासह एकत्र राहत होता. विमल ही पतीपासून विभक्त झाली असून, आई-वडिलांकडेच राहून धुणीभांडी करून उदरनिर्वाह करते. भगवानचे वडील दिनकर बोराडे हे ट्रॅक्टरचालक होते, तर आई कमलबाई धुणीभांडी करायची. भगवानचा मोठा भाऊ विष्णू त्याच्या कुटुंबियांसह याच कॉलनीत अन्यत्र भाड्याने राहतो.
अमोल विमलशी लगट करतो व त्याची वाईट नजर असल्याचे तिच्या आई-वडिलांच्या नजरेत आले. यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच अमोलला खडसावले होते. यापुढे आमच्या घरी येऊ नको, असेही बजावले होते. त्याचा प्रचंड राग अमोलला आला होता. बुधवारी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास हातात चाकू घेऊन तो भगवानच्या घरी गेला. तेव्हा भगवान, त्याचे वडील दिनकर आणि आई कमलबाई गप्पा घरात मारत होते. घरात होम थिएटरवर गाणेही सुरू होते. अचानक घरात घुसलेल्या अमोलने धारदार चाकूने तिघांवर हल्ला चढवून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. काही मिनिटांत अमोल घराबाहेर पडला तेव्हा त्याचे कपडे रक्ताने माखलेले व हातात चाकू होता. त्यामुळे बोराडेंच्या घरात काहीतरी अघटित घडले, याचा अंदाज शेजाऱ्यांना आला. त्यांनी या घटनेची माहिती माजी नगरसेवक संजय चौधरी आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. अवघ्या काही मिनिटांत तेथे मोठा जमाव झाला. त्याचवेळी कामावरून विमल घरी आली. दारासमोर उभा असलेल्या व रक्ताने माखलेल्या अमोलला पाहून तिने हंबरडाच फोडला.
खून करून खाल्ली तंबाखू
तिघांनाही संपवून अमोल रक्ताने माखलेला चाकू घेऊन घराबाहेर येऊन उभा राहिला. तिघांनाही संपविले, असे तो बडबडत होता. एवढेच नव्हे तर सुमारे अर्धातास एकाच ठिकाणी उभा राहून त्याने तंबाखू चोळून खाल्ल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडली तेव्हा मुलगी विमल ही धुणीभांडी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. तिच्या सोबत तिची मुलगीही होती आणि मुलगा गल्लीत खेळत होता. ते तिघेही घरी नसल्यामुळेच वाचल्याची चर्चा नागरिक करीत होते.
विमल लपली शेजारच्या घरात
विमल कामावरून घरी आली तेव्हा घरासमोर लोक जमलेले होते. शिवाय आरोपी अमोल हा चाकू घेऊन उभा होता. त्याला पाहून घाबरलेली विमल ही शेजारच्या घरात तिच्या मुलांसह लपून बसली. पोलीस अमोलला ताब्यात घेऊन गेले आणि मृतदेह घाटीत नेले. यानंतरही विमल त्या घरातून बाहेर आली नाही. पोलिसांना समजले, तेव्हा त्यांनी तेथे जाऊन तिला धीर दिला. त्यानंतर तिने माझे आई-वडील आणि भाऊ बरा आहे, का असे विचारले.
अमोलवर सुरू होते मानसिक उपचार
आरोपी अमोल याच्यावर २०१७ पासून पडेगाव परिसरातील एका रुग्णालयात मानसिक उपचार सुरू होते. तो मनोरुग्णासारखे वागत होता, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. शिवाय तो बोराडे कुटुंबाकडेच जास्त राहत असे.
जेवणाचे ताट सोडून गेला अमोल
आरोपी अमोलच्या आईने त्याच्यासाठी खिचडी केली होती. रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास त्याच्या आईने अमोलसाठी जेवणाचे ताट वाढले होते. जेवणाचे ताट तसेच सोडून तो हातात चाकू घेऊन बोराडे कुटुंबियांच्या घरी गेला होता.
कमलबाईच्याअंगात देवी
मृत कमलबाई या मोहटादेवीच्या भक्त होत्या. त्यांच्या अंगात देवीची वारी येत होती. शिवाय त्या घरात देवपूजा करण्यात खूप वेळ देत असत.
स्मशानभूमीतून आणली राख
कमलबाईच्या सांगण्यावरून अमोलने काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीतून राख घरी आणून ठेवली होती, अशी माहिती त्याच्या आईने दिली. ही बाब समजल्यानंतर त्याला बेदम मारले होते. मात्र, तो कमलाबाई, दिनकर आणि भगवान सांगेल तसेच वागत होता. ते त्याला घरातून बोलावून नेत. यावरून त्याच्या आईचे आणि कमलबाईचे भांडणही झाले होते, असे अमोलच्या वडिलांनी सांगितले.
मोठा भाऊ दहा वर्षांपासून वेगळा
मृत भगवानचा मोठा भाऊ विष्णू हा चारचाकीच्या दालनात वाहनचालक आहे. आई-वडिलांसोबत पटत नसल्याने तो २००८ पासून चौधरी कॉलनीतील अन्य गल्लीत घर भाड्याने घेऊन पत्नी आणि मुलांसह राहतो. केवळ २०१४ साली तो भगवानच्या लग्नासाठी एक तासभर घरी आला होता. यानंतर तो कधीच आई-वडिलांकडे आला नाही. आठ दिवसांपूर्वी वडील त्याच्या घरी जाऊन भेटले होते, तेव्हा विष्णूने त्यांना शंभर रुपये दिले होते. दरम्यान, आज आई-वडील आणि भावाची हत्या झाल्याचे कळल्यानंतर तो घरी आला.
अमोलचे कुटुंब सिल्लेगावचे
मृत अमोलचे कुटुंब मूळ सिल्लेगावचे रहिवासी आहे. त्याचा मोठा भाऊ लक्ष्मण सिल्लेगाव येथे शेती करतो, तर लहान भाऊ पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. अमोल दहावीपर्यंत शिकला आणि मेटल फोर्जिंग कंपनीत कामाला जाऊ लागला. कामात सातत्य नसल्याने सहा महिन्यांपूर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. तेव्हापासून मिळेल ते काम तो करीत होता.
भगवानचे दोन विवाह; मात्र...
मृत भगवानचा २०१४ साली पहिला विवाह झाला. मात्र, त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. यामुळे २०१७ साली त्याने दुसरे लग्न केले. मात्र, दुसरी पत्नीही त्याला सोडून निघून गेल्याचे भाऊ विष्णूने सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर, उपनिरीक्षक अन्नलदास, उपनिरीक्षक सुरेश जारवाल, उपनिरीक्षक ताहेर शेख आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलीस घटनास्थळी : माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील दृश्य भयंकर होते. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून अंगावर काटा येत होता. पोलिसांनी दिनकर, कमलबाई आणि अमोल यांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया एमआयडीसी सिडको ठाण्यात सुरू होती.