चाकणमध्ये शाळेकडे खंडणीची मागणी; मनसेच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 10:49 PM2020-12-16T22:49:11+5:302020-12-16T22:49:33+5:30
पोलिसांनी केले गजाआड
चाकण: चाकण येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने लॉकडॉउनमध्ये जास्त फी का आकारली ? याप्रकरणी शाळेची बदनामी टाळण्यासाठी व आंदोलन न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्या बदल्यात दोन टप्प्यात त्यांनी काही रक्कम वसूल देखील केले. उर्वरित रक्कम न दिल्यास शाळेची बदनामीची धमकी देणाऱ्या मनसेच्या जिल्हा संघटकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
अभय अरुण वाडेकर ( राहणार चाकण, तालुका खेड जिल्हा पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा संघटकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र इंद्रनील सिंग ( वय ५१, राहणार इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . याबाबत पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले मनसेचे अभय अरुण वाडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा संघटक आहेत. त्यांनी (२७ नोव्हेंबर ) ला प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मनसेच्या सात ते आठ कार्यकर्त्यांसह जाऊन लॉकडाऊन मध्ये शाळेने जास्त फी का आकारली यावरून धमकी दिली. व त्या प्रकरणी निवेदनही दिले. ( ५ डिसेंबर) ला अभय वाडेकर यांनी फिर्यादी महेंद्रसिंग यांना भोसरीतील नाना नानी पार्क येथे भेटून शाळेसमोर आंदोलन करून शाळेची बदनामी करण्याची धमकी दिली. शाळेचे बदनामी टाळायचे असेल तर एक लाख रुपये खंडणी दे अशी मागणी केली. त्याच वेळी फिर्यादी यांच्याकडून त्यांनी पाच हजार रुपये घेतले.त्यानंतर पुन्हा ( ७ डिसेंबर ) ला आरोपीने आंबेठाण चौक जवळ महेंद्रसिंग यांच्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले.
एकूण ३० हजार रुपये दिल्यानंतर यापुढे आणखी पैसे देऊ शकणार नसल्याचे फिर्यादी महेंद्रसिंग यांनी सांगितले . मात्र उर्वरित पैसे न दिल्यास मनसेचे वाडेकर यांनी शाळेच्या बदनामीची धमकी दिली. व परत पैशांसाठी फिर्यादी सिंग यांना फोन केला. महेंद्रसिंग यांनी त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत अभय वाडेकर यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार चाकण पोलिसांत अभय वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. चाकण पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी अभय वाडेकर यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.