बैष्णोई गँगच्या नावाने मागितली खंडणी, दोघे गजाआड
By प्रशांत माने | Published: October 15, 2023 07:39 PM2023-10-15T19:39:48+5:302023-10-15T19:40:05+5:30
खंडणीसाठी धमकावणाऱ्या आकाशचा बैष्णोई गँगशी संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डोंबिवली: मित्राचे व्यवहारातले पैसे देत नाही म्हणून बैष्णोई गँगच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणा-या आरोपीसह त्याच्या मित्राला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आकाश गिरी आणि इंद्रजित यादव अशी दोघा आरोपींची नावे आहेत. दरम्यान, खंडणीसाठी धमकावणाऱ्या आकाशचा बैष्णोई गँगशी संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांना शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आकाशने फोन कॉल तसेच व्हॉटसअॅप मेसेजद्वारे मी बैष्णोई गँगचा असून तु इंद्रजित यादव याचे पैसे त्याला दे नाहीतर तुझी मर्डर करतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबतची तक्रार जाधव यांनी रामनगर पोलिस ठाण्यात केली होती. बैष्णोई गँगचे नाव आरोपीने घेतल्याने डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्यावतीने तपासकामी पोलिस उपनिरिक्षक केशव हासगुळे, पोलिस हवालदार विशाल वाघ, सुनिल भणगे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपीचे नाव निष्पन्न करून यात आकाश गिरी याच्यासह इंद्रजित यादव अशा दोघांना अटक केली.
...त्यामुळे दिली धमकी
आकाश आणि इंद्रजित हे दोघे मित्र असून इंद्रजित हा बांधकाम व्यावसायिक जाधव यांच्या साईटवर कंत्राटाचे काम करायचा. जाधव यांच्याकडून इंद्रजितचे व्यवहारातले काही पैसे येणे बाकी होते. ते पैसे मिळण्यासाठी आकाशने जाधव यांना बैष्णोई गँगच्या नावाने धमकी दिल्याचे तपासात समोर आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक गिते यांनी दिली.