हॉटेल मालकाकडे मागितली १० लाखांची खंडणी : क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 09:31 PM2018-10-26T21:31:12+5:302018-10-26T21:42:28+5:30
तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही तर तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू... असा फोन खणाणला आणि..
पुणे : तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही तर तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकास धमकावल्या प्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल वामन भिडे (वय ५५, रा. जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जंगली महाराज रस्त्यावर पांचाली नावाचे हॉटेल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी दिली. यासंदर्भात सविस्तर असे की, फिर्यादीला बुधवारी रात्री बाराच्या सुमारास एका मोबाइल क्रमांकावरुन फोन आला होता. कॉल करणाऱ्याने मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगितले. मुंबई येथे एका व्यक्तीला पिस्तूल खरेदी करताना पकडले आहे. त्याने तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आल्याचे सांगितले आहे. गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुम्ही १० लाख रुपये द्या. अन्यथा गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करण्यात येईल, असे त्याने धमकावले. त्यामुळे भिडे यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे करत आहेत.
.........................
असा घडतो गुन्हा
ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, तो कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहातो याचा अभ्यास तोतया अधिकारी करतो. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव विचारुन घेतो. यानंतर रात्री बारा ते पहाटे चार दरम्यानच संबंधीत पोलीस ठाण्यात कॉल करून, ठाणे अंमलदाराला तुमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी बोलण झाल्याचे भासवतो. ज्याच्याकडे खंडणी मागायची आहे, त्याला पोलीस ठाण्याला बोलावून घेण्यास सांगितले जाते. इतक्या रात्री पोलिसांनी बोलावले असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती घाबरून गेलेला असतो. हा व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर होताच, त्याच्या मोबाइलवर फोन करून सेटलमेंटसाठी दबाव टाकला जातो. व्यक्ती सेटलेमेंटला तयार झाल्यास त्याला मुंबईला पैसे घेऊन बोलावले जाते.
.....................
यापूर्वी देखील घडला असा प्रकार
याप्रकारचा आणखी एक गुन्हा एका पेट्रोल पंपचालकाबाबत घडला होता. त्यालाही अशाचप्रकारे धमकावून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. मात्र संबंधीत पेट्रोल पंप चालकाने तक्रार दाखल केली नाही. या गुन्ह्यातही तोच प्रकार झाला आहे.
..........................
याप्रकारे फसवणूकीच्या घटना लक्षात घेता, ठाणे अंमलदारांना निर्देश देण्यात आले आहेत की संबंधित अधिकाऱ्याने पत्र दिल्याशिवाय किंवा त्याने पथक पाठवल्याशिवाय कोणाही व्यक्तीस पोलीस ठाण्यात बोलावून घेऊ नये.
- प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक