कारवाई टाळण्यासाठी खंडणी उकळणारा अटकेत; दहा लाखांची केली होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:40 AM2022-02-21T11:40:15+5:302022-02-21T11:41:30+5:30
मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी यातील उमेशला अटक केली. यातील अन्य दोघांचाही शोध सुरु आहे.
ठाणे- अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी तीन लाख ६० हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटापैकी उमेश यादव (रा. साठेनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने शनिवारी अटक केली. त्याची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३ येथे ठाणे जनता सहकारी बँकेच्या पाठीमागे अंकिता इंडस्ट्रिज ही अभिनंदन दोशी (५५) ची कंपनी आहे. १९ एप्रिल २०२१ ते १७ नाव्हेंबर २०२१ या काळात चंद्रभूषण विश्वकर्मा, उमेश यादव आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी दोशी यांना त्यांच्या कंपनीच्या आवारातील झाड कापल्याबाबत तसेच बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याची तक्रार करून त्यावर कारवाई होऊ नये यासाठी एक व्हिडिओ बनविला. तो प्रसारित करून दोशी यांच्याकडे त्यांनी दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी तीन लाख ६० हजारांची रक्कम रोख आणि गुगल पेच्या माध्यमातून त्यांनी स्वीकारून त्यांचा छळ करून नाहक बदनामी केली.
याप्रकरणी कथित पत्रकार चंद्रभूषण विश्वकर्मा, उमेश यादव यांच्यासह तिघांविरुद्ध १० फेब्रुवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी यातील उमेशला अटक केली. यातील अन्य दोघांचाही शोध सुरु आहे.