स्पा मॅनेजरकड़ून खंडणी उकळणारा सराईत खंडणीखोर मास्टर जेरबंद
By मनीषा म्हात्रे | Published: July 13, 2022 09:32 PM2022-07-13T21:32:00+5:302022-07-13T21:32:26+5:30
Extortion Case :गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका स्पाचे मॅनेजर तिमीर जितेंद्र मारू यांच्या ट्विटर हँडलवर स्पाबाबत चुकीची पोस्ट करणाऱ्या व्यक्तिसोबत संपर्क साधला.
मुंबई : गावदेवी परिसरातील स्पा मॅनेजरकड़ून खंडणी उकळणाऱ्या सराईत खंडणीखोर सुदई यादव उर्फ सुधीर मास्टर (३५) याला गावदेवी पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याला गुह्यांत मदत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका स्पाचे मॅनेजर तिमीर जितेंद्र मारू यांच्या ट्विटर हँडलवर स्पाबाबत चुकीची पोस्ट करणाऱ्या व्यक्तिसोबत संपर्क साधला. तेव्हा कॉल धारकाने ८ जुलै रोजी कुलाबा येथील एका हॉटेल ठिकाणी येण्यास सांगितले. मारू तेथे पोहचले असता त्यांना एका टॅक्सीतून आलेल्या इसमाने त्यांचे स्पा चालू ठेवायचे असेल तर दर महिना २५ हजार रूपये खंडणी म्हणून दयायचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. मारू यांनी घाबरून ५ हजार रुपये दिले. पुढे ११ तारखेला आणखीन ५ हजार रुपये पाठवले. अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी १२ जुलै रोजी व्ही. पी. रोड येथील एका हॉटेलला येण्यास सांगितले.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून मास्टरला अटक केली. अटक आरोपी सुदई यादव उर्फ सुधीर मास्टर याचेविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाणेस आतापर्यंत ५ विविध गंभीर गुन्हयांची नोंद असून त्यामध्ये ४ खंडणीचे आणि १ बलात्कार यासारख्या गंभीर गुन्हयांचा समावेश आहे. मास्टरला यापूर्वी सन २०२० मध्ये पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, मुंबई यांनी एक वर्षांकरीता मुंबई शहर आणि उपनगर येथून हद्दपार केले होते.
तुमच्याकड़ूनही खंडणी उकळली आहे का?
या गुन्हेगारांबाबत आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी तात्काळ गावदेवी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा तसेच सर्व आस्थापना धारक यांनी देखील अशाप्रकारच्या खंडणीखोर व्यक्तींच्या धमकीस घाबरून न जाता तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात आले आहे.