बलात्काराच्या गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:05 PM2024-06-30T18:05:41+5:302024-06-30T18:05:54+5:30
आरोपी अतुल यादव याने पीडित महिलेला त्याच्या मैत्रिणीस भेटण्याकरीता नेण्याचा बहाणा करुन मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे येथील एका हॉटेलमध्ये नेले.
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा :- नायगांव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या आरोपीला एका वर्षांनंतर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी रविवारी दिली आहे.
आरोपी अतुल यादव याने पीडित महिलेला त्याच्या मैत्रिणीस भेटण्याकरीता नेण्याचा बहाणा करुन मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे नेल्यानंतर आरोपीने पिडीत महिलेला कोणते तरी गुंगीकारक पदार्थ मिश्रीत ज्युस पाजून त्यांच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संभोग करुन त्याचा व्हिडीओ बनविला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी देत जून २०२२ से ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत पिडीत महिलेसोबत बाफाणे परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तसेच दहीसर येथील हॉटेलमध्ये नेवून जबरदस्तीने शारीरिक संभोग करून बलात्कार केला होता. १४ सप्टेंबरला नायगांव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.
गेल्या १ वर्षापासून उघडकीस न आलेल्या गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास चालू करण्यात आला. गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नसल्याने त्याच्या शोधासाठी उपयुक्त माहीती प्राप्त करण्याचे अनुषंगाने गुन्हयाचे घटनास्थळातील हॉटेलमधील साक्षीदार व्यक्तींकडून आरोपीची माहीती प्राप्त केली. आरोपीचे उपलब्ध अपूर्ण नाव, पत्याचे आधारे निरंतर सातत्याने तपास करत मिळालेल्या बातमीदाराकडून आरोपीचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषणातून ठावठिकाणा निष्पन्न केला. आरोपी अतुलकुमार जयप्रकाश यादव (२५) याला सायनच्या अँटॉपहील चर्चजवळून शिताफीने ताब्यात घेतले.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकूर, अमोल कोरे, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.