बलात्काराचा आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटला, पीडितेच्या घरी पोहोचला अन्...पुढे जे काही घडलं त्यानं एकच खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 04:42 PM2022-09-21T16:42:23+5:302022-09-21T16:42:56+5:30
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे एका बलात्कार प्रकरणातील आरोपीनं चक्क पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आणि पुढे त्यानं जे काही केलं त्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे एका बलात्कार प्रकरणातील आरोपीनं चक्क पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आणि पुढे त्यानं जे काही केलं त्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचं झालं असं की आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला आणि थेट पीडितेच्या घरी पोहोचला. तिथं जाऊन जवळच्या एका झाडावर गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली आहे.
आरोपीच्या कुटुंबीयांना ही बाब कळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबीयांकडून बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. लोकांचा वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी शवविच्छेदन गृहाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. माहिती मिळताच अनेक पोलीस अधिकारीही घटनास्थळावर पोहोचले आहेत.
एका पोलिसाचं निलंबन
या घटनेनंतर एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर तरुणाचे गेल्या पाच वर्षांपासून या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसऱ्याशी लावलं. पण लग्नानंतरही दोघांची भेट होत राहिली. मुलीच्या सासरच्या लोकांनी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
मुलाच्या कुटुंबीयांचा संताप
त्याचवेळी जिल्ह्यातील बडे अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहितीही मागवण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणाच्या बाजूनं असणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर पीडितेच्या बाजूनं कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार झालेलं नाही.