चिमुरडीवर बलात्कार, हत्या प्रकरण: विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सादर केला दाेषाराेपपत्राचा मसुदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:40 PM2021-03-22T16:40:35+5:302021-03-22T16:41:23+5:30
Rape and Murder Case : विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांनी हा दोषारोपपत्राचा मसुदा न्यायालयात आज सादर केला.
रायगड - पेण येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरकार पक्षाकडून अलिबाग येथील विशेष पोक्साे न्यायालयात दोषारोपपत्राचा मसुदा सादर करण्यात आला. विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांनी हा दोषारोपपत्राचा मसुदा न्यायालयात आज सादर केला.
पेण येथे 30 डिसेंबर 2020 रोजी आदिवासी समाजाच्या एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्दयी हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला हाेता. आदिवासी समाजाकडून पेण बंदची हाकही देण्यात आली हाेती.
या घटनेनंतर काही तासांतच हे कृत्य करणार्या आदेश पाटील या नराधमाला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अपहरण, बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, पोक्साे , अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने अॅड.उज्ज्वल निकम यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केली होती.साेमवारी या प्रकरणात अलिबाग येथील विशेष पोक्साे न्यायालयात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हजर होते. त्यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्राचा मसुदा सादर केला. या प्रकरणात दोषारोप निश्चितीकरिता 5 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.