बलात्कार अन् धर्मपरिवर्तनासाठी दबाव.., मुंबईतील मॉडेलची तक्रार, रांचीतील तरुणावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:29 AM2023-06-01T06:29:12+5:302023-06-01T06:29:32+5:30
वर्सोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेत पुढील तपासासाठी गुन्हा रांची पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मुंबई : झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात संस्था चालविणाऱ्या तन्वीर अख्तर मोहम्मद खान याने आपल्यावर बलात्कार केला, तसेच धर्मपरिवर्तनासाठी दबावही आणत असल्याची तक्रार मुंबईतील एका मॉडेल तरुणीने केली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेत पुढील तपासासाठी गुन्हा रांची पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मूळ बिहारची रहिवासी असलेली तक्रारदार मॉडेल वर्कशॉपच्या निमित्ताने रांची येथे आली होती. तिथे ती तन्वीरच्या संपर्कात आली. त्याने २०२१ पासून वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉडेल तरुणीने केला आहे, तसेच याबाबत कुणाकडे तक्रार केल्यास धमकावत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. पुढे, मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ही तरुणी मुंबईत येऊ पाहत असतानाच धर्म बदलून लग्न करण्यासाठी तन्वीरने तिच्याकडे तगादा लावला. नाव बदलण्यासाठी दबावही आणला. शूटिंगसाठी बँकॉकला येण्यासाठी सांगितले. मॉडेल तरुणीने नकार देताच, तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ते फोटो आई आणि भावाला पाठवले. तिच्या नातेवाइकांना तिला तक्रारीसाठी पुढे जाण्यास सांगितले.
बनावट आयडी आणि त्रास
आरोपीचा बँकॉकमध्ये येण्यास दबाव वाढताच ती बँकॉकला गेली. तेथेही आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. मुंबईत आल्यानंतरही तन्वीरचा त्रास सुरू होताच. तरुणीने यापूर्वी आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पुढे, आरोपीने तिच्या नावाने बनावट आयडी बनवले आणि तिला त्रास देण्यासाठी आक्षेपार्ह फोटो शेअर करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार, वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.