बालिकेवर अत्याचार; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 04:11 PM2020-08-17T16:11:29+5:302020-08-17T16:11:57+5:30
दहावर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणात संबंधित आरोपीला खामगाव येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एका दहा वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणात संबंधित आरोपीला खामगाव येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा महत्वूपर्ण निकाल सोमवारी सकाळी दिला.
खामगाव तालुक्यातील एका गावातील पिडित बालिकेच्या आईचे निधन झाले. दरम्यान वडीलही सोडून गेल्याने ती भावंडांसोबत राहत होती. २२ डिसेंबर २०१६ रोजी स्थानिक इंदिरा नगर भागातील रामा विठ्ठल नंदनवार याने तिला दहा रूपयांची नोट दाखवित, बोरं आणायला सोबत येण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला गावाजवळील एका निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. कोणला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपीने पोबारा केला. घरी परतल्यावर भेदरलेल्या पिडीतेने कुणालाही याबाबत सांगितले नाही. भावाने विचारले असता पोटात दुखते असे सांगून ती झोपुन राहिली. दुसऱ्या दिवशी शेजारी महिलेस तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी या प्रकरणाचा तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने या प्रकरणात अकरा साक्षीदार तपासले.
दोष सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. रजनी बावस्कर-भालेराव यांनी काम पाहिले. पिडीतेस शासनाकडून पुर्नविस्थापनासाठी योग्य ती मदत मिळावी, यासाठी जिल्हा विधी समितीकडे न्यायालयाने शिफारस केली.
अशी ठोठावली शिक्षा!
अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा कलम ३,२,५ आजीवन सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, हा दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा. कलम ३,१ ह अन्वये सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड हा दंड, न भरल्यास १ महिना कारावास कलम ३७६ (२) (आय) व कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये प्रत्येकी दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्याने दोन महिने शिक्षा, याप्रमाणे शिक्षा सुनावली.