गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 22:08 IST2021-08-30T22:07:09+5:302021-08-30T22:08:47+5:30
Rape case of minor girl : सत्र न्यायालयाचा निर्णय

गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने आरोपी आकाश बंकट येदानी (२३) याला १६ वर्षांखालील गतीमंद मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. के. जी. राठी यांनी सोमवारी हा निर्णय दिला.
आरोपीला धमकी देण्याच्या गुन्ह्यात ६ महिने कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला ४ नोव्हेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे.
आरोपी तरोडा, ता. काटोल येथील रहिवासी असून तो विवाहित व व्यवसायाने मजूर आहे. त्याला दोन मुलेदेखील आहेत. पोलीस तक्रारीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजूर असून ते रोज कामावर जात होते. त्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच रहात होती. आरोपी त्याचा फायदा घेत होता. मुलगी एकटी असताना आरोपी तिच्या घरी जात होता व विविध प्रलोभणे देऊन तिच्यावर बलात्कार करीत होता. त्याने स्वत:चे कुकृत्य लपवण्यासाठी मुलीला ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे मुलगी गप्प राहिली. १ नोव्हेंबर २०१८ रोजी मुलगी आजारी पडल्यानंतर तिला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. दरम्यान, मुलीला सक्तीने विचारपूस करण्यात आली असता आरोपीच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला.
डीएनए चाचणीने दिले बळ
आरोपीविरुद्धच्या गुन्ह्याला डीएनए चाचणीने बळ दिले. चाचणीच्या अहवालातून आरोपी हा पीडित मुलीच्या गर्भातील बाळाचा पिता असल्याचे सिद्ध झाले. याशिवाय, सरकारने आरोपीविरुद्ध १७ साक्षिदार तपासले. तसेच, ठोस वैद्यकीय पुरावे सादर केले. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.