Shahnawaz Hussain: भाजपाच्या शाहनवाज हुसैनांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार; कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:28 AM2022-08-18T10:28:09+5:302022-08-18T10:29:37+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने पोलिसांना काही वर्षांपूर्वी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रात आणि बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना मोठा झटका बसला आहे. हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे.
एका जुन्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना हे आदेश दिले आहेत. शाहनवाज हुसैन यांच्याविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे हुसैन यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचबरोबर पोलिसांनी तीन महिन्यांत या प्रकरणाचा तपास करावा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने पोलिसांना काही वर्षांपूर्वी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेकडून सादर करण्य़ात आलेल्या गोष्टींवरून पोलिसांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदविले आहे. तसेच पोलिसांनी जो रिपोर्ट कनिष्ठ न्यायालयात सादर करण्यात आला तो देखील अंतिम रिपोर्ट नव्हता असे म्हटले आहे.
जानेवारी 2018 मध्ये दिल्लीस्थित महिलेने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. छतरपूर फार्म हाऊसमध्ये शाहनवाज हुसैन यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला होता. कनिष्ठ कोर्टाने देखील आपल्या निर्णयात पोलिसांचा युक्तिवाद नाकारला होता, कोर्टाने म्हटले होते की महिलेच्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा आहे.
शाहनवाज हुसैन कोण?
शाहनवाज हुसैन हे बिहारचे विधानपरिषद आमदार आहेत. बिहारमधील जेडीयू-भाजप युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. ते तीनवेळा खासदारही होते. 1999 मध्ये ते किशन गंजमधून खासदार झाले. मात्र, 2004 मध्ये त्यांना या जागेवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर 2006 मध्ये भागलपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते लोकसभेत पोहोचले. 2009 मध्येही ते येथून विजयी झाले होते. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.