माहेरी आलेल्या महिलेवर घरात घुसून अत्याचार; पाठलाग करत आलेला सासरवाडीतील दुकानदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 06:49 PM2020-12-10T18:49:25+5:302020-12-10T18:51:55+5:30
सासरवाडीतल्या दुकानदाराने महिलेच्या माहेरात घुसून केला अत्याचार
अंबाजोगाई : परभणी जिल्ह्यातील महिला अंबाजोगाईत माहेरी आली होती. तिच्या पाठोपाठ आलेल्या सासरवाडीतील किराणा दुकानदाराने माहेरच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि.७) रात्री घडली. त्या दुकानदारावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
याप्रकरणी २५ वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचे सासर परभणी जिल्ह्यात देऊळगाव (ता. पूर्णा) हे आहे. तर, सचिन निळकंठ दुधाटे (वय २२) याचेही देऊळगाव येथे किराणा दुकान आहे. सोमवारी पीडिता तिच्या तीन मुलांना घेऊन माहेरी अंबाजोगाई येथे आली होती. माहेरी तिची वयोवृद्ध आई असून त्यांची दृष्टी कमी झालेली आहे. सर्व कुटुंबीय जेवण करून झोपी गेल्यानंतर पीडिता रात्री ११ वाजता घराबाहेर बसली होती. त्यावेळी तिला सचिन दुधाटे समोर दिसल्याने पिडीतेने त्याची विचारपूस केली.
बोलण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या सचिनला पिडीतेची अंध आई आणि तिन्ही मुलं झोपल्याचे लक्षात आले. त्यानंतर तो बळेच घरात घुसला आणि पिडीतेवर अत्याचार केला. आरडाओरडा केला तर आजूबाजूचे लोक गोळा होतील आणि बदनामी होईल या भीतीने पीडिता शांत राहिली. झालेल्या घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास तुझ्यासह नातेवाईकांना जीवे मारील अशी धमकी देऊन सचिन तिथून निघून गेला. त्यानंतर भाऊ आणि इतर नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर पिडीतेने बुधवारी (दि.९) अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून सचिन दुधाटे याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय सुचिता शिंगाडे करत आहेत.
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सचिनला अंबाजोगाईतील सदर बाजारातून ताब्यात घेतले. गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सोमवार (दि.१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.