तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; कोथरुड पोलिसांनी केली आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 08:04 PM2020-11-05T20:04:14+5:302020-11-05T20:05:06+5:30
फिर्यादी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो येत होता. दरम्यान, यातून फिर्यादी गर्भवती राहिली.
पुणे : नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या बलात्कार केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. यातून या तरुणीला मुल झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
सचिन विठ्ठल झोरे (वय २२, रा़ केळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे़
फिर्यादी तरुणीचा सचिन हा नातेवाईक आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते़ ती घरी एकटी असताना सचिन याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध निर्माण केले. हे कोणाला न सांगण्याची धमकी दिली. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान फिर्यादी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो येत होता. दरम्यान, यातून फिर्यादी गर्भवती राहिली. त्याने मुलीला घरच्यांना न सांगण्याची धमकी दिली असल्याने तिने ही बाब घरी सांगितली नाही़ नुकतीच तिने एका मुलाला जन्म दिला़ तिच्या घराच्यानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली. त्यानंतर कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमिला क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.