पतीने केला असेल तरी बलात्कार हा बलात्कारच; गुजरात कोर्टाने महिलेचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:59 AM2023-12-19T05:59:35+5:302023-12-19T05:59:43+5:30
समाजात पाठलाग करणे, विनयभंग, शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यांना किरकोळ गुन्हे म्हणून चित्रित केले जाते आणि सिनेमासारख्या लोकप्रिय माध्यमातही त्याचा प्रचार केला जातो.
अहमदाबाद : बलात्कार हा बलात्कारच असतो, भले तो पुरुषाने पत्नीविरुद्ध केला असेल. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मौन तोडण्याची गरज असल्याचे गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती दिव्येश जोशी यांनी आदेशात म्हटले की, महिलांवरील हिंसाचाराच्या घटना नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त आहेत. समाजात पाठलाग करणे, विनयभंग, शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यांना किरकोळ गुन्हे म्हणून चित्रित केले जाते आणि सिनेमासारख्या लोकप्रिय माध्यमातही त्याचा प्रचार केला जातो.
लैंगिक गुन्ह्यांकडे ‘मुले ही मुलेच राहतात’ या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा पीडितांवर कायमस्वरूपी परिणाम होतो, असे कोर्टाने म्हटले आहे. सुनेवर क्रौर्य केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका महिलेचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली.
पैसे कमविण्याच्या लालसेपोटी महिलेचा पती आणि मुलाने सुनेवर बलात्कार केला आणि तिचा विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ बनवून पॉर्न साइटवर पोस्ट केले, असा आरोप आहे.
हे मौन तोडा...
कोर्टाने म्हटले आहे की, हे मौन तोडले पाहिजे. असे करताना, महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी महिलांच्या तुलनेत पुरुषांचे कर्तव्य आणि भूमिका अधिक ठाम असणे आवश्यक आहे. अनेक देशांत वैवाहिक बलात्कार बेकायदेशीर आहे.
आईला होती जाणीव...
कुटुंबाला हॉटेलची विक्री रोखण्यासाठी पैशांची गरज होती. यामुळे मुलाने मोबाइलवर संबंधांचे नग्न व्हिडिओ बनवले आणि ते आपल्या वडिलांना पाठविले. मुलाच्या आईला याची पूर्ण कल्पना होती कारण तिच्या उपस्थितीत हे कृत्य घडले होते. पीडिता एकटी असताना सासऱ्यानेही तिचा विनयभंग केला. सासूला या बेकायदा आणि लज्जास्पद कृत्याची जाणीव होती आणि तिने पती आणि मुलाला असे कृत्य करण्यापासून रोखले नाही, तिने गुन्ह्यात समान भूमिका बजावली, असे न्यायालयाने म्हटले आहे.