लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपीला हिमाचल प्रदेशातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 07:48 PM2018-10-24T19:48:15+5:302018-10-24T19:48:32+5:30
गोव्यातील एका एकवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका पंचवीस वर्षीय युवकाला हिमाचल प्रदेशात जेरबंद करण्यात आले.
मडगाव: गोव्यातील एका एकवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका पंचवीस वर्षीय युवकाला हिमाचल प्रदेशात जेरबंद करण्यात आले. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मडगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या बलात्कार प्रकरणात बबलू नंदलाल याला हिमाचल प्रदेश राज्यातील मंडी येथे ताब्यात घेतले. रेल्वेतून त्याला आज गोव्यात आणल्यानंतर मागाहून त्याला रितसर अटक करण्यात आली.
आज बुधवारी त्याला मडगावच्या न्यायालयात उभे केले असता, पुढील पोलीस तपासाठी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार ) व 420 (फसवणुक करणो) या कलमाखाली बबलु नंदलाल याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. मागच्या महिन्यात या संशयितावर मडगाव पोलीस ठाण्यात त्या युवतीने तक्रार नोंदविली होती. संशयिताने तक्रारदाराला लग्नाचे आमिष दाखविले होते. नंतर त्याने लग्नाला नकार दिला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या युवतीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती.
पोलीस तपासात संशयित नंदलाल हा हिमाचल प्रदेशात दडी मारुन बसल्याची पक्की माहिती मडगाव पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक हरिष नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव एलआयबी पोलीसांचे एक पथक हिमाचल प्रदेश येथे गेले होते. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने नंदलाल याच्या मुसक्या आवळल्या.