लग्न मोडण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, सोशल मीडियावर झाली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:12 AM2022-04-12T10:12:04+5:302022-04-12T10:41:34+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून सप्टेंबर २०२१ मध्ये आईच्या मोबाइलमधील इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर तिची दानिशशी ओळख झाली होती.
जळगाव : स्वत:शी लग्न करण्यासाठी दुसऱ्याशी जुळलेले लग्न मोडण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून दानिश मुलतानी (रा. गेंदालाल मील, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री साडेआठ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून सप्टेंबर २०२१ मध्ये आईच्या मोबाइलमधील इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर तिची दानिशशी ओळख झाली होती. त्यातून मैत्री व नंतर प्रेमप्रकरण बहरले. डिसेंबर २०२१ मध्ये दानिश याने पीडितेला लग्नाची मागणी घातली, मात्र त्यास तिने नकार देत माझे लग्न ठरले असून २१ एप्रिल रोजीचा मुहूर्त काढण्यात आल्याचे सांगितले. तरीदेखील दानिशकडून खूप आग्रह होऊ लागला. अशातच तो फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडितेला भेटण्यासाठी आला व रामटेक येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतरदेखील त्याने लग्नाचा तगादा लावला, मात्र त्यास तरुणीने नकार दिला असता बदनामी करुन लग्न मोडण्याची धमकी दिली.
या भीतीमुळे पीडिता नागपूर येथे आली. तेथून त्याने तिला घेऊन मलकापूर येथे सावत्र आईकडे ठेवले. त्यानंतर जळगाव येथे आणले. ७ एप्रिल रोजी त्याच्या आईने घरातून हाकलून लावले. त्यामुळे दानिश याने पीडितेला मित्राच्या घरी ठेवले. तेथेदेखील त्याने पुन्हा अत्याचार केला. यानंतर त्याने लग्नास टाळाटाळ करून घरी निघून जाण्यास सांगितले. सोमवारी पीडिता पुन्हा जळगावात आली असता दानिश याच्याशी संपर्कच झाला नाही. त्यामुळे पीडिता नूतन मराठा महाविद्यालयाच्या बाहेर रडत बसली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी चौकशी केली असता तिने आपबिती कथन केली व तेथून सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात आणले. पीडितेच्या फिर्यादीवरून दानिश मुलतानीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.