महिलेला महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, जनसंपर्क अधिकारी भदाणेचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 04:07 PM2022-02-27T16:07:03+5:302022-02-27T16:07:31+5:30
Rape Case : एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेचा वादग्रस्त व फरार जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याने २९ वर्षीय महिलेला उल्हासनगर महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून तुर्भे नवीमुंबई येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात शनिवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजता गुन्हा दाखल झाला असून सदर घटना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली आहे.
उल्हासनगर महापालिकेत जनसंपर्क अधिकारी पदाच्या नोकरीसाठी शाळा सोडण्याच्या जन्मदाखल्यात फेरफार केल्या प्रकरणी, गेल्या सोमवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेंव्हा पासून भदाणे फरार असून पोलीस त्याच्या मार्गावर आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त अत्युत सासे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान शनिवारी रात्री साडे आठ वाजता नवीमुंबई तुर्भे येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात भदाणे यांच्यावर एका २९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पीडित महिला ही शहरातील कॅम्प नं-२ रमाबाई आंबेडकरनगर येथील राहणारी असून तीला महापालिकेत नोकरीचे आमिष दाखविले होते.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पांढऱ्या कार मध्ये चोपडा कोर्ट येथून सायंकाळी साडे सात वाजता नवीमुंबई तुर्भे येथील एका लॉज मध्ये भदाणे घेऊन गेला होता. तेथे महिलेवर जबरीने अत्याचार केला. घाबरलेल्या महिलेने अखेर शनिवारी तुर्भे येथील एपीएमसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी भदाणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर भदाणे फरार असून पोलीस पथके त्याच्या मार्गावर आहेत.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गेल्या सोमवारी वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही, पोलिसांनी त्याला अटक केली नाही. याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी भदाणे यांच्या निलंबनाची फाईलवर सही का केली नाही. याबाबत सर्वस्तरातून आयुक्तवर टीकेची झोळ उठली आहे. महापालिका निवडणूक येत्या दोन महिन्यावर येऊन ठेपली असून असे थंड आयुक्त नको. अशी भूमिका राजकीय पक्षाचे नेते खाजगीत व्यक्त करीत आहेत. परिणामी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी आयुक्त राजनिधी यांची उचलबांगडी होण्याची चर्चाही शहरात रंगली आहे.