गिरणीवर गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस सश्रम कारावास, वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निकाल
By महेश सायखेडे | Published: August 10, 2022 05:25 PM2022-08-10T17:25:22+5:302022-08-10T17:25:56+5:30
Court News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपी अशोक पांडुरंग फलके, रा. सोनेगाव (आबाजी), ता. देवळी यास दंडासह सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
- महेश सायखेडे
वर्धा - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपी अशोक पांडुरंग फलके, रा. सोनेगाव (आबाजी), ता. देवळी यास दंडासह सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास, भादंविच्या कलम ३५४ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पीडिता ही पीठ गिरणीवर गेली होती. ती परतीचा प्रवास करीत असताना आरोपीने तिला वाटेत अडवून तिला घरात नेत तिचा विनयभंग केला. आई-वडील कामावरून परत आल्यावर पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले. पोलीस निरीक्षक मल्हारी नारायण तापळीकाटे यांनी प्रकरणाचा तपास केला होता. याप्रकरणी न्यायालयात पाच साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून समीर कडवे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.