डॉक्टरकडून गरोदर महिलेचा विनयभंग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 10:57 AM2023-04-02T10:57:41+5:302023-04-02T10:58:10+5:30
अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रुग्णासाठी प्रत्येक डॉक्टर हा देव असतो. मात्र, ज्याला देव समजतो तोच आपली मर्यादा सोडून जेव्हा विकृत चाळे करतो तेव्हा रुग्णही सुरक्षित नसतो. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी १ एप्रिल रोजी घडली आहे. एका गरोदर महिलेशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी अलिबागमधील एका भूलतज्ज्ञ डॉक्टरवर अलिबाग पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुरुड तालुक्यातील पीडित फिर्यादी महिला ही गरोदर असल्याने अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. १ एप्रिल रोजी पीडित महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर भूलतज्ज्ञ डॉक्टर याने पीडित महिलेचा बीपी तपासण्याच्या बहाण्याने तिच्या छातीला हात लावून लज्जास्पद संभाषण करत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने पीडित महिला घाबरली.
या महिलेने अलिबाग पोलिस ठाणे गाठून घडला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. त्यानुसार अलिबाग पोलिसांनी डॉक्टरविरोधात भादंवि कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेनंतर संबंधित गरोदर महिला प्रचंड घाबरली होती. या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.