उपचाराच्या बहाण्याने माहीम दर्गाच्या विश्वस्ताकडून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 09:52 PM2021-01-01T21:52:42+5:302021-01-01T21:53:37+5:30
Rape : विवाहितेचा आरोप, माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई - उपचाराच्या बहाण्याने वक्फ बोर्ड महाराष्ट्राचे सदस्य आणि माहीम दर्गाचे विश्वस्त डॉ. मुदासीर लांबेने बलात्कार केल्याचा आरोप ३३ वर्षीय विवाहितेने केला आहे. पुढे याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला धमकावले. काही महिन्याने दोघांच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेही तलाक दिल्यामुळे विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. याच आरोपावरून शुक्रवारी माहीम पोलिसांनी लांबे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार या माहीम परिसरात राहण्यास असून टेली कॉलिंग कंपनीत कामाला आहे. विवाहितेने केलेल्या आरोपानुसार, गेल्या वर्षी ११ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात लांबेंंसोबत ओळख झाली. लांबेनी समाजसेवा संबंधित कामानिमित्त भेटण्यास सांगितले. दोन-तीन वेळा कामानिमित्त भेटी झाल्या. पोटाच्या आजाराबाबत लांबे यांना सांगताच, त्यांनी २८ जानेवारी रोजी सर्व रिपोर्ट घेऊन क्लिनिकमध्ये बोलवले. त्यानुसार क्लिनिकमध्ये गेल्यानंतर कमरेला इंजेक्शन देत डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. पुढे याबाबत पोलिसांत जाण्याचे सांगताच, याचे व्हिडीओ पतीला पाठवून दोघांमध्ये संबंध असल्याची धमकी तिला दिली. तसेच पोलिसांसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबतही संबंध असल्याने आपल्याविरोधात काही करणे शक्य नसल्याचे सांगितल्याने, घाबरून तिने याबाबत कुणाला सांगितले नाही. त्यानंतर वारंवार कॉल करून तिला बोलावून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
अशात ऑगस्ट महिन्यात दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तलाक दिला. तिने याबाबत लांबेला सांगताच त्याने लग्न करण्याचे आमीष दाखवले. पुढे तो पत्नीच्या गुप्तरोगासाठी बाहेर असल्याचे सांगून तिला टाळू लागला. तिच्याशी बोलणेही बंद केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. पुढे, लांबेने काहीही न केल्याचा आव आणत तिलाच धमकाविणे सुरु केले. अखेर, तिने वकीलाकडे धाव घेत घड़लेला प्रकार सांगितला. त्यांच्या सल्ल्याने पोलिसांत तक्रार दिली. गेल्या महिन्यात ७ डिसेबर रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला. २० तारखेला जबाब नोंद झाल्यानंतर शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी क़ाय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोमवारी बैठक
माहीम दर्गा मानवतेचे व्यासपीठ आहे. या घटनेबाबत विश्वस्त मंडळ सोमवारी बैठक घेऊन पुढील कारवाईचा निर्णय घेतील.
सोहेल खंडवाणी, व्यवस्थापकीय विश्वस्त, माहीम दर्गा