दोन लहान मुलींवर बलात्कार, दोषीला मृत्यूपर्यंत जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:43 AM2021-04-02T03:43:40+5:302021-04-02T03:44:13+5:30
दाबी (जिल्हा कोटा) गावात २०१९ मध्ये पाच आणि सहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या खटल्यात बुंदी येथील पोक्सो (लहान मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा) न्यायालयाने हिरालाल खाटी (वय २७) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कोटा (राजस्थान) : दाबी (जिल्हा कोटा) गावात २०१९ मध्ये पाच आणि सहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या खटल्यात बुंदी येथील पोक्सो (लहान मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा) न्यायालयाने हिरालाल खाटी (वय २७) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
खाटी हा चित्तोडगढ जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याला पोक्सो न्यायालयाने (क्रमांक दोन) जन्मठेपेची शिक्षा सुनावली, अशी माहिती सरकारी वकील महावीर मेघवाल यांनी दिली.
४ जुलै, २०१९ रोजी दोन अल्पवयीन मुलींच्या वडिलांनी दाबी पोलीस ठाण्यात खाटीविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. खाटी हा या मुलींच्या वडिलांच्या घरी भाडेकरू होता. पाच आणि सहा वर्षांच्या मुली त्यांचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना घरी खेळत होत्या. खाटी याने त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत:च्या खोलीत नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला, असे मेघवाल म्हणाले.
खाटीविरुद्ध पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला लगेचच अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश अरुण कुमार यांनी खाटी याला बुधवारी दोषी ठरवून त्याला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्याच्या सुनावणीत १३ जणांची साक्ष नोंदविली गेली आणि किमान २० दस्तावेज सादर केले गेले होते, असे मेघवाल म्हणाले.