परिचिताकडून शाळकरी विदयार्थिनीवर बलात्कार, संशयित जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 08:47 PM2020-03-12T20:47:26+5:302020-03-12T20:54:17+5:30
पीडितेवर लैंगिक अत्याचार करताना तिच्याकडून विरोध झाल्याने संशयिताकडून तिला मारहाणही केली तसेच तिचे डोके जमिनीवरही आपटले
मडगाव - परिचित युवकाकडून एका तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचे अपहरण होउन नंतर तिच्यावर बलात्कार करण्याची खळबळजनक घटना गोव्यात घडली असून, मायणा - कुडतरी पोलिसांनी संशयिताला जेरबंद केले आहे. पीडितेवर लैंगिक अत्याचार करताना तिच्याकडून विरोध झाल्याने संशयिताकडून तिला मारहाणही केली तसेच तिचे डोके जमिनीवरही आपटले. मेल्वीन आंतोनियो फर्र्नाडीस (२३) असे संशयिताचे नाव असून, त्याच्यविरुध्द भारतीय दंड संहितेच्या ३६३ (अपहरण) , ३७६ (बलात्कार) , ३0७ (खुनाचा प्रयत्न करणे), गोवा बाल कायदा कलम ८ व बाल संरक्षण कायदा कलम ४ अंतर्गंत गुन्हा नोंद केल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. अधिक तपासासाठी मेल्वीनला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वैदयकीय तपासात पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित युवती जखमी झाल्याने सुरुवातीला तिला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर तिला गोमेकॉत हलविण्यात आले. तिची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याच्या हददीतून बुधवारी दुपारी एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाले होते. पिडीताच्या कुटुंबियाने सर्वकडे शोधाशोध केल्यानंतर मागाहून या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. सुरुवातीला पोलिसांनी अपहरण व गोवा बाल कायदयांतर्गंत अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद केला होता. मात्र सांयकाळी केपेच्या आंबावली येथील डोंगरावर एक शाळकरी विदयार्थीनी जखमी अवस्थेत सापडली होती. गावकऱ्यांनी ही बाब केपे पोलिसांना कळविली नंतर यासंबधी मायणा - कुडतरी पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक सेराफीन डायस व मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली असता, अपहरण झालेलीच ती युवती असल्याचे तसेच तिच्यावर लौंगिक अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट ्रझाले होते.
रात्रभर पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. अनेकांची धरपकडही केली. नंतर पोलीस संशयितापर्यंत पोहचले. कुकर्म करुन घरी लपून बसलेल्या मॅल्विन अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, सुरुवातीला त्याने दाद दिली नाही. शेवटी मात्र तो पोलीस खाक्यासमोर वरमला व पोपटासारखा बोलू लागला व त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली.
मेल्वीन हा परदेशात बोटीवर कामाला होता. एका महिन्यापुर्वी तो मायदेशात आला होता. लवकरच तो पुन्हा कामावर रुजू होणार होता.
संशयिताने दुचाकीवरुन त्या मुलीला आंबावली येथे नेले होते असेही तपासात उघड झाले आहे. दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दुचाकीच्या डिकीमध्ये बियरच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत. दुपारी शाळा सुटल्यानंतर आपण त्या युवतीचे अपहरण करुन तिला दुचाकीवरुन नेउन बलात्कार केल्याची कबुली संशयित मेल्वीनने दिली आहे. उपअधिक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर पुढील तपास करीत आहेत.