डीपफेक व्हिडिओचा आरोपी गजाआड; रश्मिकाचा जबरा फॅन, बीटेक इंजिनिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 01:23 PM2024-01-21T13:23:36+5:302024-01-21T13:25:49+5:30

रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीला शनिवारी आंध्र प्रदेशातून अटक केली

Rashmika mandana Deepfake Video Accused arrest in guntur, Rashmika mandana's Jabra Fan, BTech Engineer | डीपफेक व्हिडिओचा आरोपी गजाआड; रश्मिकाचा जबरा फॅन, बीटेक इंजिनिअर

डीपफेक व्हिडिओचा आरोपी गजाआड; रश्मिकाचा जबरा फॅन, बीटेक इंजिनिअर

मुंबई - नॅशनल क्रश आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुष्पा फेम अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडिओ फेक होता. मॉर्फ व्हिडिओ आणि ओरिजनल व्हिडिओ ट्वीट करत एका युजरने ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, रश्मिकाने या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. तर, बिग बी अमिताभ बच्चन यांनीही चिंता व्यक्त केली होती. आता, याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा रश्मिकाचा मोठा फॅन आहे. 

रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीला शनिवारी आंध्र प्रदेशातून अटक केली. यापूर्वी तपासादरम्यान बिहारमधील १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली होती. त्यानंतर, आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी रश्मिकाचा जबरा फॅन असून बीटेक इंजिनिअर असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ईमानी नवीन असं आरोपीचं नाव असून त्याने डीपफेक व्हिडिओ बनवल्याची कबुलीही दिली. ईमानी हा रश्मिकाच चाहता असून त्याने तिच्या नावाने इंस्टाग्राम पेज सुरू केले होते. त्यासोबतच इतरही दोन अभिनेत्यांच्या नावाने पेज तो चालवतो, त्यांना लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर, रश्मिकाच्या नावावरील पेजला ९० हजार फॉलोअर्स होते, ते फॉलोअर्स वाढविण्यासाठी त्याने हा डीपफेक व्हिडिओ बनवल्याचं तपासात पुढे आलं आहे. 

आरोपीने चेन्नईतील एका इंजिनिअरींग कॉलेजमधून बीटेक शिक्षण घेतलं आहे. तसेच, २०१९ मध्ये गुगलचा डिजिटल मार्केटींगचा कोर्सही पूर्ण केला आहे. तर, वेबसाईट डेव्हलपिंग, फोटोशॉप, युट्यूब व्हिडिओ आणि एडिटिंगसारखे कोर्सही पूर्ण केले आहेत. त्याने, युट्यूबवरुनच डीपफेक व्हिडिओ बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.

काय होतं डीपफेक व्हिडिओत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा दिसत होता. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत होती आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला होता. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला होता. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नव्हे तर झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी होती. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला होता.

व्हिडिओ पाहून काय म्हणाले होती रश्मिका

रश्मिकाने व्हायरल झालेल्या डीप फेक व्हिडिओबाबत एक ट्वीट केलं होतं. "मला हे शेअर करताना अत्यंत दु:ख होत आहे. पण, ऑनलाईन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओबाबत भाष्य करणं गरजेचं आहे. असा व्हिडिओ केवळ माझ्यासाठीच नाहीतर प्रत्येकासाठी भीतीदायक आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे आपलं खूप नुकसान होत आहे.आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मला पाठिंबा दिलेले कुटुंबीय, चाहते आणि मित्रपरिवाराची मी आभारी आहे. पण, जर मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना हे माझ्याबरोबर घडलं असतं. तर याकडे मी कसं पाहिलं असतं याचा मी विचारही करू शकत नाही. अनेकांच्या बाबतीत हे घडण्याआधी एक समाज म्हणून याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे," असं रश्मिकाने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. 
 

Web Title: Rashmika mandana Deepfake Video Accused arrest in guntur, Rashmika mandana's Jabra Fan, BTech Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.