रेव्ह पार्टीत सामील झालेल्या अभिनेत्री हीना पांचाळसह २४ संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:28 PM2021-06-29T19:28:53+5:302021-06-29T20:32:29+5:30
Rave Party : नाशिक ग्रामीण पोलिसांनी एकूण २९ जणांना अटक केली असून बंगला मालकालाही मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
नाशिक : इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यात बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचालसह तब्बल २२ व्यक्ती मादक अंमली पदार्थांचे नशेत झिंगलेल्या अवस्थेत रेव्ह पार्टीत पोलिसांच्या छाप्यात शनिवारी मध्यरात्री पकडले गेले होते. पोलिसांनी एकुण २९ संशयितांना अटक करुन सोमवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १३ पुरुष आणि ११ महिला अशा २५ संशयितांना एक दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.२९) या सर्वांना पुन्हा न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने पांचालसह सर्वांची पोलीस कोठही ५ जुलैपर्यंत वाढविली आहे.
जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील स्काय ताज आणि स्काय लगून व्हिला या दोन आलिशान बंगल्यामध्ये बिग-बॉस या मराठी सिझन-२मध्ये वाइल्डकार्ड घेऊन सहभागी झालेली अभिनेत्री हिना पांचलसह बॉलिवूड व दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले कलाकार, कोरिओग्राफर असे एकुण २२ तरुण-तरुणी एकत्र येत दारु, हुक्का, गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचे सेवन करत ‘हवाईयन थीम’च्या रेव्ह पार्टी करत होते. याबाबतची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांना मिळाली. त्यांनी त्वरित याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना कळविले. त्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच वालावलकर, उपिभागीय अधिकारी अर्जुन भोसले हे साध्या वेशात इगतपुरी पोलिसांचा फौजफाटा घेऊन मध्यरात्री बंगल्यांवर जाऊन धडकले. यावेळी पोलिसांनी पांचालसह १२ महिला आणि दहा पुरुषांना बंगल्यांमधून ताब्यात घेतले होते. सोमवारपर्यंत या गुन्ह्यातील संशयितांची संख्या २९वर जाऊन पोहचली होती. यामध्ये ११ महिला आणि १८ पुरुषांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. यापैकी ७पुरुषांवर गुंगीकारक औषधी द्रव्य मन:प्रभावित पदार्थ अधिनियम १९८५च्या (एनडीपीएस) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरित दहा पुरुषांसह ११ महिलांविरुध्द कोटपा कायदा, दारुबंदी कायदा आणि कलम-१८८नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेत
रेव्ह पार्टीतील २२ तरुण-तरुणींची वैद्यकिय तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या सर्वांचे रक्त व लघवीचे नमुनेही संकलित करुन न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, यापैकी
प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार एनडीपीएस कायद्यांतर्गत संशयितांची संख्या वाढण्याची श्यक्यता आहे.