रेव्ह पार्टी उधळली, ९५ नशेबाज ताब्यात; पाच मुलींचाही समावेश, ठाण्यात ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:12 AM2024-01-01T06:12:53+5:302024-01-01T06:13:36+5:30
या पार्टीचे आयोजन करणारे सुजल महाजन (१८) आणि तेजस कुबल (२३) यांना अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात अमली पदार्थांचे सेवन करीत रेव्ह पार्टी करणारे ९० तरुण आणि पाच तरुणी यांच्या दोन गटांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या पार्टीचे आयोजन करणारे सुजल महाजन (१८) आणि तेजस कुबल (२३) यांना अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
इन्स्टाग्रामवर सांकेतिक भाषेचा वापर करीत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी एक हजार रुपये आकारून घोडबंदर रोडवरील वडवली गावाजवळ खाडीकिनारी पार्टी ठरविली हाेती. पार्टीसाठी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा रोड भागातून तरुण-तरूणी आले होते. त्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ही पार्टी सुरू असतानाच छापा टाकला आणि आयोजक- सहभागी तरूणांची झिंग उतरवली. या छाप्यात २९ मोटारसायकली आणि आठ लाखांहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले.
मद्यधुंद अवस्थेत थिरकताना सापडले
या पार्टीतील डीजेचे साहित्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. एका ठिकाणी ५० तर दुसऱ्या ठिकाणी ४० अशा दाेन गटांत हे नशेबाज पाेलिसांना मिळाले. यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर थिरकत होते. पार्टीचे आयोजन करणाऱ्या दुकलीकडून आठ लाख तीन हजार ५६० रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
ठाण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून ९५ तरुणांवर कारवाई करीत नशेबाजांची रेव्ह पार्टी उधळून लावणाऱ्या ठाणे पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. यापूर्वी अशा पार्ट्यांवर कारवाया होत नव्हत्या, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.
रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत
या सर्व तरुणांच्या रक्ताची तपासणी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. त्यांच्या रक्ताचे नमुने कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्वागताची झिंग
- नववर्ष स्वागतानिमित्ताने आयोजित पार्ट्यांत अमली पदार्थांची विक्री आणि सेवन होऊ नये, यासाठी पार्ट्यांवर नजर ठेवून कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत.
- वडवलीतील रेव्ह पार्टीची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे उपायुक्त शिवराज पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मध्यरात्री तीनच्या सुमारास ही पार्टी उधळून लावली.
काय मिळाले पार्टीत?
अटक केलेल्या दोघांच्या ताब्यातून आठ लाख तीन हजार ५६० रुपये किमतीचे ७० ग्रॅम चरस, ४१ ग्रॅम एलएसडी, २.१० ग्रॅम एस्कॅटसी गोळ्या, २०० ग्रॅम गांजा, बीअर- वाइन- व्हिस्की असे अमली पदार्थ, गांजा पिण्याचे साहित्य सापडले.
या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ९५ तरुणांवर कारवाई झाली; परंतु ज्यांनी अमली पदार्थ सेवन केले नाहीत, त्यांना कलम १६९ नुसार सोडले जाईल. यापूर्वीही वडवली गावात याच आयोजकांनी दोन वेळा, तर गोव्यात एकदा पार्टीचे आयोजन केले आहे. ही त्यांची चौथी पार्टी होती.