Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:37 PM2021-07-07T20:37:18+5:302021-07-07T20:38:29+5:30
Igatpuri Rave Party : जिल्हा व सत्र न्यायालय : इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले
नाशिक - जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्यात दोन आलिशान बंगल्यात मागील आठवड्यात अंमली पदार्थांचे सेवनासह रंगलेली हवाइयन रेव्ह पार्टी नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून उधळून लावली होती. या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालसह सर्व 25 संशयितांना आज बुधवारी (दि.7) जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या संशयितांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकुण २२ तरुण तरुणींकडून गांजा, हुक्का, चरस, कोकेन यांसारख्या मादक अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे आढळून आले होते. या दोन दिवसीय हवाईयन रेव्ह पार्टीची कुणकुण पोलिसांना लागताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या गेल्या शनिवारी मध्यरात्री रेव्ह पार्टी उधळली होती. या छाप्यात पोलिसांनी अभिनेत्री हिना पांचालसह एकुण २२ संशयितांना स्काय ताज, स्काय व्हिला या बंगल्यांमधून रंगेहात ताब्यात घेतले होते. यानंतर या गुन्ह्यात नायजेरियन ड्रग्ज विक्री करणारा नायजेरियन पीटर उमाही देखील पोलिसांच्या हाती लागला. एकूण संशयितांची संख्या 27वर पोहचली. त्यापैकी 25 संशयितांना पोलिसांनी अटक करून वेळोवेळी न्यायालयात हजर करत पोलीस कोठडी मिळविली. पोलिसांनी काही संशयितांविरुध्द प्रथमदर्शनी कोटपा, दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला तर काही संशयितांविरुध्द एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केली आहे. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळनंतर बुधवारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.पी.नाईक - निंबाळकर यांच्या विशेष कोर्टात सर्व 25 संशयितांना दुपारी हजर करण्यात आले. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुन घेत संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दोन संशयित आठवड्यापासून फरारच
रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज पुरविणाऱ्या संशयित सराईत गुन्हेगार नायजेरियन उमाही पीटरच्या संपर्कातील दोन संशयित अद्यापही ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या मागावर पोलिसांची पथके असून त्यांचा शोध घेतला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कोठून आणि कसे मिळविले याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. पीटर याच्याविरुद्ध यापूर्वीही काशीमिरा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच त्याचे पासपोर्टही जप्त करण्यात आलेले आहे.
ड्रग्ज फेकले स्विमिंग पूलमध्ये पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच संशयितांनी चरस, कोकेन सारखे ड्रग्ज बंगल्यातील स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. किती प्रमाणात स्विमिंग पुलमध्ये ड्रग्ज फेकले? याचा तपास केला जात आहे. वैज्ञानिक न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकाकडून याबाबत पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या सर्व संशयितांच्या रक्त, लघवीच्या नमुन्यांची तपासणी केली जात असून त्यांच्या अहवाल येणे बाकी आहे.