रेशीम कार्यालयाचा लाचखोर तांत्रीक अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:51 PM2019-04-26T19:51:19+5:302019-04-26T19:55:03+5:30
शेड बांधकामाचे देयक अदा करण्यासाठी शेतकऱ्याला मागितले पैसे
वाशिम : रेशीम शेती करणाऱ्या चार शेतकऱ्यांनी केलेल्या शेड बांधकामाच्या देयकाची फाईल पुढे पाठविण्याकरिता संबंधितांना प्रत्येकी २ हजारांप्रमाणे ८ हजारांची लाच मागून पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने जिल्हा रेशीम विकास कार्यालयाच्या तांत्रीक अधिकाऱ्यास २६ एप्रिल रोजी रंगेहाथ अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, यातील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले, की तक्रारदार व त्याच्याच गावातील इतर तीन शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ‘मनरेगा’अंतर्गत तुती लागवड केलेली आहे. जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडून तुती लागवड, शेड बांधकामाकरिता व मजूरीपोटी शासनाकडून तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. दरम्यान, संबंधित चारही शेतकऱ्यांनी शेड बांधकाम करून संपूर्ण कागदपत्रांसह देयक कार्यालयात सादर केले. आरोपी संदिप मोरे याने तक्रारदारासह इतर तीन जणांचे बिल काढण्याकरीता फाईल पुढे पाठविण्यासाठी प्रत्येकी दोन हजार अशा ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व सापळा कारवाईदरम्यान पंचासमक्ष जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम येथे पहिला हप्ता ५ हजार रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोºहाडे, पोहेकॉं नितीन टवलारकर, दिलीप बेलोकार, नापोशी सुनील मुंदे, विनोद अवगळे आदिंनी सहभाग घेतला.