"सॉरी पप्पा, काहीच शिल्लक राहिलं नाही..."; सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 07:04 PM2022-12-28T19:04:42+5:302022-12-28T19:09:38+5:30
कन्हैयालालने एकदा रीट परीक्षा दिली होती. त्यात त्याला १३५ गुण मिळाले. यावेळी आपल्याला नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र परीक्षा रद्द झाली.
राजस्थानच्या हनुमानगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने कीटनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना सिंचन विभागाच्या रिकाम्या असलेल्या एका खोलीत आढळून आला. कन्हैयालाल असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्याजवळ कीटकनाशकाची रिकामी बाटली सापडली. तसेच बॅगेमध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.
कन्हैयालालने सुसाईड नोट लिहिली आहे. "सॉपी पापा, माझ्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मी जातोय. तुम्ही स्वत:ची आणि सगळ्यांची काळजी घ्या. अनिल आणि सुनील दोन्ही भाऊ चांगले आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. पण मी काहीच करू शकलो नाही" अशा शब्दांत वडिलांसाठी पत्र लिहून कन्हैयालालने टोकाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैयालालने एकदा रीट परीक्षा दिली होती. त्यात त्याला १३५ गुण मिळाले. यावेळी आपल्याला नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र परीक्षा रद्द झाली. त्यानंतर त्यानं वनपाल पदाची परीक्षा दिली. मात्र ती परीक्षाही रद्द करण्यात आली. त्यानंतर कन्हैयालालनं पुन्हा रीट परीक्षेची तयारी सुरू केली. पण सतत परीक्षा रद्द झाल्याने तो तणावाखाली होता.
तणावाला कंटाळून कन्हैयालालने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. २४ डिसेंबरला कन्हैयालालचा वरिष्ठ शिक्षक भरतीचा सामान्यज्ञानाचा पेपर होता. मात्र परीक्षेआधीच त्याने सुसाईड केलं. विशेष म्हणजे हा पेपरही लीक झाला. कन्हैयालालचा मोठा भाऊ धर्मपाल सरकारी शिक्षक आहे.
सरकारी नोकरी मिळत नसल्याने, परीक्षा सातत्याने रद्द होत असल्यामुळे कन्हैयालालने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. परीक्षा रद्द होत असल्यानं तो तणावाखाली होता. त्यामुळेच त्यानं टोकाचं पाऊल उचललं. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. कन्हैयालालच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"