जेवण बनविण्यास नकार, सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:40 AM2023-03-10T08:40:01+5:302023-03-10T08:40:20+5:30
आरोपीला अवघ्या काही तासांत अटक
भिवंडी : मोलमजुरीसाठी पश्चिम बंगाल राज्यामधून आलेल्या दोघा कामगारांमध्ये जेवण बनविण्यावरून झालेल्या वादातून एकाने सहकारी कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली. दीपक बर्मन (३५) असे मृत कामगाराचे नाव आहे. हत्या करणारा पिज्यू बर्मन हा कामगार घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत असतानाच निजामपुरा पोलिसांनी त्याला पकडले.
पिज्यु बर्मन व त्याचा मित्र भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात काम करत होते. त्यांच्याकडे त्यांच्याच गावातील दीपक बर्मन हा कामाच्या शोधात आला. या दोघांनी त्यास आपल्यासोबत ठेवून घेत कामालाही लावले. दरम्यान, बुधवारी रात्री पिज्यू याने दीपक यास जेवण बनविण्यास सांगितले. दीपकने जेवण बनविता येत नसल्याचे सांगत जेवण बनविण्यास नकार दिला. दोघांत हाणामारी झाली. त्यात पिज्यू याने दीपक याच्या डोक्यात दगड घातला.
घटनेबाबत कळताच निजामपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, सहायक आयुक्त सुनील वडके पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकचा मृतदेह ताब्यात घेत हत्या करून लपलेल्या पिज्यूला काही तासांत पकडले.