बलात्काराचा खटला मागे घेण्यास नकार दिला; आरोपींनी महिलेवर अॅसिड फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 08:55 AM2019-12-08T08:55:48+5:302019-12-08T08:56:24+5:30
उन्नावमध्ये पिडीतेला जाळण्याच्या एक दिवस आधी एका 30 वर्षीय महिलेवर चार व्यक्तींनी अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली होती.
मुजफ्फरनगर : देशात सध्या महिलांचा अत्याचाराविरोधातील आवाज दाबला जात आहे. हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बल्ताकार करून जाळून टाकण्यात आले, तर उन्नावमध्ये दोन दिवसांपूर्वी बलात्कार पिडीता न्यायालयात जात असताना तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. यात तिचा दिल्लीमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्य़ाच मुजफ्फरनगरमधून आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे.
उन्नावमध्ये पिडीतेला जाळण्याच्या एक दिवस आधी एका 30 वर्षीय महिलेवर चार व्यक्तींनी अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, चारही व्यक्तींनी न्यायालयातून बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी धमकावले होते. तिने यास विरोध करताच तिच्यावर अॅसिड टाकण्यात आले.
महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ती 30 टक्के भाजली आहे. मेरठच्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. शाहपूर ठाण्याचे पोलिस अधिकारी गिरिजा शंकर त्रिपाठी यांनी सांगितले की, बुधवारी रात्री चारही व्यक्ती महिलेच्या घरी घुसले होते आणि तिच्यावर अॅसिड फेकले. त्यांनी महिलेला जिल्हा न्यायालात सुरू असलेल्या बलात्काराचा खटला मागे घेण्यास सांगितले होते.
पोलिसांनी सांगितले की, महिलेवर अॅसिड फेकणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असून त्यांची नावे आरिफ, शाहनवाज, शरीफ आणि आबिद अशी आहेत. हे चारही आरोपी फरार आहेत.
या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उन्नावमध्ये बलात्कार पिडीतेवर आरोपींनी रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली होती. अशा प्रकारे न्याय मागणाऱ्या महिलांचा आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न आरोपींकडून केले जात आहेत.