रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बाठेने कारागृहातून कुणाला केले फोन? ८ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:00 AM2021-05-21T06:00:56+5:302021-05-21T06:01:55+5:30
कारागृहात बाळ बोठेने केला मोबाइलचा वापर, आठ आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
अहमदनगर : पारनेर उपकारागृहातील आरोपींकडे आढळलेल्या मोबाइलचा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे यानेही वापर केल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी बोठे याला सहआरोपी केले आहे.
मागील महिन्यात नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची तपासणी केली होती. यावेळी कारागृहातील आरोपी सौरभ पोटघन व अविनाश कर्डिले यांच्याकडे दोन मोबाईल सापडले होते. दरम्यान, कारागृहात आरोपींना जेवण देणारे सुभाष लोंढे, प्रवीण देशमुख यांनी हे मोबाइल आरोपींना दिल्याचे समोर आले होते. यावेळी पारनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वापरलेल्या मोबाइल नंबरचे पोलिसांनी सीडीआर काढल्यानंतर बोठे यानेही त्याचा वापर केल्याचे समोर आले. त्यामुळे बोठे याला आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी केले आहे. मोबाइल देणारे व वापरणारे अशा एकूण आठजणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
बोठेचे कुणाला फोन?
बोठे याने याने या मोबाइलवरून कुणाला फोन केले होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बोठे हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्याने ज्यांना फोन केले त्यांचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.