रेखा जरे हत्याकांड प्रकरण: बाळ बोठेकडून तुरुंगात मोबाइलचा वापर, १५ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:43 AM2021-09-21T11:43:55+5:302021-09-21T11:45:31+5:30
रेखा जरे हत्याकांडात पोलिसांनी बोठे याला अटक केल्यानंतर, पोलीस कोठडीतून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
अहमदनगर: न्यायालयीन कोठडीत असताना अनधिकृतरीत्या मोबाइलचा वापर केल्याप्रकरणी रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात सोमवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात बोठे याच्यासह पंधरा जणांचा समावेश आहे.
रेखा जरे हत्याकांडात पोलिसांनी बोठे याला अटक केल्यानंतर, पोलीस कोठडीतून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याला पारनेर येथील कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी मे, २०२१ मध्ये कारागृहाची तपासणी केली, तेव्हा बोठे याच्यासइ इतर आरोपीकडे दोन मोबाइल आढळून आले होते.
या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तुरुंग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तपास केला. तपासात बोठे याने वकिलांशी संपर्क करण्यासाठी मोबाइलचा वापर केल्याचे आढळून आले. तुरुंगात आरोपींना मोबाइल पुरविणारे व मोबाइल वापरणारे अशा पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
जामीन अर्जावर बुधवारी निर्णय
बोठे याच्याविरोधात यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठे याच्या वतीने जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर २२ सप्टेंबर रोजी निर्णय होणार आहे. दरम्यान, बोठे याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग तर तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे.