रेखा जरे हत्याकांड प्रकरण : महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने चौकशीच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 03:39 AM2020-12-06T03:39:50+5:302020-12-06T07:07:34+5:30

Rekha Jare murder case: जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली.

Rekha Jare murder case: Women and Child Welfare Officer Vijaymala Mane under investigation | रेखा जरे हत्याकांड प्रकरण : महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने चौकशीच्या फेऱ्यात

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने चौकशीच्या फेऱ्यात

googlenewsNext

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे. घटनेनंतर पोलीस माने यांच्या घरी गेले तेव्हा त्या घरी नव्हत्या. त्यांचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे त्यांचाही शोध सुरू केल्याचे पोलीस  सूत्रांनी सांगितले.

जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर माने यांनी स्वत: कार चालवून जरे यांना दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माने यांचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे. बोठे हत्याकांडाचा सूत्रधार निघाल्याने माने यांनी बोठे याच्याशी केलेला संपर्कही संशयाच्या फेऱ्यात आला आहे. 

सागर भिंगारदिवेच्या घराची झडती
जरे यांच्या हत्याकांडात बाळ बोठे याचा साथीदार असलेल्या सागर भिंगारदिवे याच्या केडगाव येथील घराची शनिवारी पोलिसांनी झडती घेतली. घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले.

जरे यांची बोठेविरोधात तक्रार
मयत रेखा जरे यांनी २२ डिसेंबर २०१८ रोजी नगर शहरातील कोतवाली पोलिसांना निवेदन देऊन बाळ बोठे याच्या विरोधात तक्रार केली होती. बोठे याने त्याच्या मोबाईलवरून जरे यांच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता. हा संदेश आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच पाठविला असल्याचे जरे यांनी निवेदनात म्हटले होते.

बोठेचा शोध लागेना
हत्याकांड घडवून आणल्यानंतर बोठे शहरातून फरार झाला. पोलिसांची पाच पथके त्याचा विविध ठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. पोलीस त्याच्या मित्रांवरही लक्ष ठेऊन आहेत.

Web Title: Rekha Jare murder case: Women and Child Welfare Officer Vijaymala Mane under investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.