बदनामीच्या भितीतून रेखा जरे यांचे हत्याकांड; मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सात जणांविरोधात दोषारोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:03 PM2021-06-08T15:03:09+5:302021-06-08T15:04:44+5:30
Rekha Jare's Murder Case : या गुन्ह्यात बोठे याचा सहभाग उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता.
अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याच्यासह एकूण सात आरोपींविरोधात मंगळवारी तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले.
बाळ बोठे, जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात 450 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून खून करणे तर उर्वरित सहा आरोपींविरोधात फरार आरोपींना मदत करणे या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आला आहे.
बोठे याने 30 2020 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट येथे जरे यांची हत्या घडवून आणली होती. या गुन्ह्यात बोठे याचा सहभाग उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता. बोठे हैदराबाद येथे जाऊन राहिला होता. याकाळात त्याला पाच आरोपींनी मदत केली. तर नगर येथून महेश तनपुरे याने मदत केली होती.