नातेवाईकच निघाले काल्पनिक जीन; ७ महिन्यांत ४० लाखांच्या रकमेवर हात साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:28 AM2022-10-12T07:28:41+5:302022-10-12T07:28:50+5:30
घोगावाला यांच्या घरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने या त्रिकुटाने या दागिन्यांसह पैशांवर डल्ला मारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुटुंबातील धार्मिक वातावरणाचा फायदा घेत काल्पनिक जीन घरातील दागिने गिळत असल्याचे सांगून नातेवाईकच दागिन्यांवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक बाब भायखळा पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली आहे. ७ महिन्यांत या त्रिकुटाने तब्बल ४० लाखांच्या ऐवजावर हात साफ केला. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
माझगाव परिसरात राहणारे अब्दुलकादर शब्बीर गोघावाला (४०) यांच्या घरातून २३ ते २४ सप्टेंबर दरम्यान ४ लाखांच्या दागिन्यांसह १० लाखांची रक्कम चोरीला गेली. याप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. तपासा दरम्यान गोघावाला यांच्या घरातून फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्येही दागिने गायब झाल्याचे समजले. मात्र, घरातील वातावरण धार्मिक असल्याने दागिने काल्पनिक जीन घरातून गायब करत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. यावर विश्वास ठेवून त्यांनी तक्रार दिली नसल्याचे पोलिसांना समजताच, हाच धागा पकडून तपास सुरू केला.
या काळात त्यांच्या घरातून एकूण ४० लाख १८ हजार किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सुहास माने, सचिन पाटील यांनी तपास करून, घरातील सर्वांची चौकशी केली. पोलिसांनी हुसेन जुर्जर पत्रावाला, हुसेन मुर्तझा बॉम्बेवाला आणि अब्बास आदम अत्तारी यांना बेड्या ठोकल्या.
ऑनलाइन गेमिंगसह सट्टेबाजीत उधारी
बहिणीचा चुलत भाऊ असलेल्या सुरतच्या हुसेन पत्रावाला तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांनी ऑनलाइन गेमिंगसह सट्टेबाजीत उधारी केली होती. कर्जाचा डोंगर वाढला. त्यात, अल्पवयीन मुलीकडून घरातील दागिन्यांबाबत सुगावा लागताच त्यांनी चोरीचा कट आखला. काल्पनिक जीन दागिने गिळत असल्याचे सांगून दागिन्यांवर हात साफ केला. मात्र, रक्कम गायब झाल्याने तक्रारदार पोलीस ठाण्यात आले आणि पर्दाफाश झाला.
अल्पवयीन मुलीच्या मदतीने डल्ला
घोगावाला यांच्या घरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने या त्रिकुटाने या दागिन्यांसह पैशांवर डल्ला मारला. ती संधी साधून दागिने काढून ठेवायचे आणि आरोपी भेटण्यासाठी येताच त्यांना देत असे. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहे.